जनजीवनावर परिणाम, शीतपेयांना मागणी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून शहराचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहराचे तापमान 38 अंशांच्या पुढे गेल्याने शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. विशेषत: मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. शिवाय सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात कामांना पसंती दिली जात आहे. वाढत्या उष्म्याने बाजारपेठ, प्रवासी, पर्यटन आणि इतर क्षेत्रांनादेखील फटका बसू लागला आहे. एप्रिल महिन्यात एखादा वळीव पाऊस वगळता अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे उन्हाचा तडाखा कायम आहे. वाढत्या उन्हामुळे रसवंती गृहे, कोल्ड्रींक्स हाऊस फुल्ल होऊ लागली आहेत. त्याचबरोबर अननस, मोसंबी, कलिंगड, कोकम सरबत, लिंबूपाणी, आईस्क्रिम आणि ज्यूसकडेदेखील नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारच्या वेळेत घामाच्या धारा निघू लागल्या आहेत. त्यामुळे फॅन, एसी आणि कुलरचीदेखील घरघर अधिक तीव्र झाली आहे. मागील काही दिवसांत उष्म्यात अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे वयोवृद्ध आणि बालकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे नवीन आजारदेखील बळावू लागले आहेत. शहरात नागरिक छत्री घेऊन फिरताना दिसत आहेत. तर टोपी, स्कार्फ, रुमालचा वापर वाढला आहे. विशेषत: दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठदेखील ओस पडू लागले आहेत. एकूणच मानवी जनजीवनावर वाढत्या उष्म्याचा परिणाम होऊ लागला आहे.









