शिक्षक संघटनांकडून स्वागत
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. सोमवारी शहराच्या गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत करण्यासाठी विविध शिक्षक संघटना तसेच शिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागातल्या बदल्या करण्यात आल्या. शहर गटशिक्षणाधिकारी असणारे वाय. जे. बजंत्री यांची खानापूरला तर जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात असणाऱ्या लीलावती हिरेमठ यांची शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोमवारी सकाळी त्यांनी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरेमठ यांची भेट घेऊन स्वागत केले. तसेच शैक्षणिक वर्षात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा केली. बेळगाव शहरातील सरकारी शाळांचा घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी हिरेमठ यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.









