शहर स्वच्छतेच्या नवीन ठेकेदाराकडून लवकरच कामाला सुरुवात : महापालिकेकडून नियोजन
बेळगाव : बेळगाव शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर एन्व्हायरॉन्मेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 29 कोटी 33 लाख रुपयांना घेतला आहे. सदर कंपनीकडून सुरक्षा अनामत रक्कम भरण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. नवीन ठेकेदाराकडून काम सुरू झाल्यास शहरातील कचऱ्याची सकाळ आणि संध्याकाळी अशी दोनवेळा उचल केली जाणार आहे. याबाबतचा आराखडा महानगरपालिकेकडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कचरामुक्त शहर होईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बेळगाव शहराच्या काही प्रभागातील कचरा उचलण्याचा ठेका सफाई ठेकेदारांना देण्यात आला आहे. तर काही प्रभागातील कचरा महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून उचलला जातो. मात्र कचऱ्याची व्यवस्थितरित्या उचल होत नाही, अशा तक्रारी आहेत. सध्या बेळगाव शहरात दररोज 220 टनहून अधिक ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. त्यामुळे उचल केलेला कचरा तुरमुरी येथील कचराडेपोत नेऊन टाकण्यासाठी दररोज 150 हून अधिक वाहने ये-जा करतात. मनपा आयुक्तांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे त्या स्वत: सकाळी किंवा संध्याकाळच्या दरम्यान शहर व उपनगरात अचानक फेरफटका मारून पाहणी करीत आहेत. ज्या ठिकाणी कचरा दिसून येत आहे, तेथील कचरा तातडीने उचलण्याची सूचना त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना केली जात आहे.
त्याचबरोबर ब्लॅक स्पॉट हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवली जात असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. अधिकाऱ्यांकडून ब्लॅक स्पॉट हटविले जात असले तरी नागरिक पुन्हा त्याचठिकाणी कचरा टाकत आहेत. अनेकवेळा आवाहन, त्याचबरोबर दंडात्मक कारवाई करूनही नागरिकांमध्ये सुधारणा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदाराच्या माध्यमातून शहराची सफाई केली जात होती. मात्र शहर स्वच्छतेच्या ठेक्यासाठी निविदा मागविण्यात आल्यानंतर जुन्या ठेकेदारांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे बेंगळूर येथील कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा नव्याने ठेका घेतलेल्या कंपनीकडे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत केवळ सकाळच्यावेळीच शहरातील कचऱ्याची उचल केली जात होती. मात्र आता संध्याकाळच्यावेळीही कचऱ्याची उचल केली जाणार आहे.
कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार
हा प्रयोग यशस्वी न झाल्यास पहाटे 3 ते 6 पर्यंत सफाईचे काम हाती घेण्याचेही नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन ठेकेदाराकडून काम सुरू झाल्यास दोनवेळा कचरा उचलला जाणार आहे. सध्या बाजारपेठ वगळता कोठेही दोनवेळा कचऱ्याची उचल केली जात नाही. त्यामुळे भविष्यात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.









