कोनवाळ गल्लीतील नाल्याच्या सफाईचे काम पूर्ण : नागरिकांतून समाधान
बेळगाव : महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईंचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी कोनवाळ गल्लीतील नाल्याची जेसीबीद्वारे सफाई करण्यात आली. टप्प्याटप्प्याने शहरातील इतर लहान-मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहर आणि उपनगरातून जाणाऱ्या नाल्यांची संख्या मोठी आहे. मात्र नाल्यांमधील केरकचरा साचण्यासह जलपर्णीने वेढा घातला आहे. सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून नाल्यांची सफाई केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. मध्यंतरी नाल्यांची व्यवस्थित सफाई करण्यात न आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे सांडपाणी नाल्याबाहेर येऊन नागरी वसतीत शिरले.
याचा फटका नागरिकांना बसला होता. काही दिवसांपूर्वी महापालिकेत पार पडलेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासह चर्चा करण्यात आली होती. नाल्यांची सफाईची जबाबदारी बांधकाम स्थायी समितीकडे असते. त्यामुळे बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौदत्ती यांनी शहरातील कोनवाळ गल्लीतील नाल्याची सफाई करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी व टिप्परसह दाखल झाले. जेसीबीद्वारे काढलेली घाण टिप्परमध्ये भरून ती तुरमुरी कचरा डेपोमध्ये टाकण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी होत आहे. कोनवाळ गल्लीत नाल्याच्या सफाईची पाहणी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी व बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौदत्ती यांनी केली.









