कचरा समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : कचऱ्याची समस्या गंभीर बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी निपाणी, संकेश्वर, बोरगाव आदी नगरपालिका, नगरपरिषदांना भेट दिली. तेथील कचऱ्याची समस्या जाणून घेऊन विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाढत्या शहरीकरणाबरोबर अनेक समस्या डोके वर काढत आहेत. त्यामध्ये कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कचरामुक्त शहरे निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी कचऱ्याची समस्या निकालात काढण्यासाठी पाऊल उचलले आहे. निपाणी, संकेश्वर, बोरगाव आदी शहरांच्या व्याप्तीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुरळीत नियोजन नसल्याने समस्या गंभीर बनत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबण्याची सूचनाही त्यांनी केली. सुका व ओला कचरा वेगळा करून त्यापासून खतनिर्मिती तसेच इतर उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. याबरोबरच कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. सेवेमध्ये कायम असणारे कर्मचारी व कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांबद्दलही जाणून घेतले.









