महानगरपालिका सर्वसाधारण बैठकीत विरोधी गटातील नगरसेवकांकडून दोन्ही विषयांना मंजुरी देण्यास विरोध
बेळगाव : महानगरपालिकेकडून शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्याचबरोबर भूभाडे वसुलीचा ठेकाही 1 कोटी 45 लाख रुपयांना देण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही विषयांना सोमवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी न देता पुढील सभेत चर्चा करून मंजुरी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी विरोधी गटाच्यावतीने महापालिकेत करण्यात आली. या विषयावरून सोमवारची महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. केवळ भूभाडे वसुलीवर चर्चा झाली. ठेकेदाराकडून भाजी व फळविक्रेते, त्याचबरोबर नारळ व इतर प्रकारच्या विक्रेत्यांकडून दादागिरी करत भूभाडे वसूल केले जात आहे, असा गंभीर आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. त्यावेळी महापौर मंगेश पवार यांनी मागील बैठकीतील ठरावांना मंजुरी देण्यासंदर्भात विषय मांडला. त्यानंतर विरोधी गटातील नगरसेवकांनी शहर स्वच्छतेचा ठेका आणि भूभाडे वसुलीच्या ठेक्याला मंजुरी देण्यात येऊ नये, सदर विषय पुढील सभेत घेऊन त्यावर चर्चा केल्यानंतरच मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
पुढील सभेत विषय घेण्याचे कारण काय? असे सत्ताधारी गटातील नगरसेवक रवी धोत्रे यांनी विचारत सभागृहात याचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये वाक्युद्ध होऊन जोरदार कलगीतुरा रंगला. महापालिकेकडून भूभाडे वसुलीचा ठेका कितीला देण्यात आला आहे? अशी विचारणा केल्यानंतर महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी म्हणाल्या, भूभाडे वसुलीचा ठेका 1 कोटी 44 लाखांना देण्यात आला आहे. ठेकेदाराकडून सदर रक्कम महापालिकेला भरण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
त्यावर नगरसेवक मुजम्मील डोणी म्हणाले, शहरातील कोतवाल गल्ली आणि नरगुंदकर भावे चौकातील भाजी विक्रेत्यांकडून भूभाडे घेण्यात येऊ नये. यासाठी त्या ठिकाणी झोन तयार करण्यात आला आहे. तरीही त्यांच्याकडून ठेकेदाराकडून पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप केला. त्यानंतर सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली म्हणाले, अद्याप बैठे व फेरीवाल्यांची निवडणूक झालेली नाही. निवडणूक झाल्यानंतर अन्य काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शहरात झोन जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे हा विषय या ठिकाणी घेण्याचा काही संबंध नाही, असे सांगितले.
नगरसेवक आदिलखान पठाण यांनी देखील भूभाडे वसुलीसंदर्भात आक्षेप घेतला. महापालिकेने भाजीविक्रेत्यांकडून 10 रुपये घेण्यासंदर्भात ठेकेदाराला सूचना केली आहे. पण 10 रुपयांव्यतिरिक्त अधिक रक्कम वसूल केली जात आहे. मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, शहरात चार ठिकाणी वेंडींग झोन तयार करण्यात येणार होते. मात्र, त्यापैकी दोन ठिकाणीच वेंडींग झोन तयार केले जाणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांकडून भूभाडे वसूल केले जाणार नाही. कोणकोणत्या व्यापाऱ्यांकडून किती रुपये आकारले जातात, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी विरोधी गटातील नगरसेवकांनी केली.
त्यावर महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी उत्तर देताना म्हणाल्या, भाजीविक्रेत्यांकडून 10 रुपये, फळविक्रेत्यांकडून 50 रुपये आणि पाणीपुरी व तत्सम विक्रेत्यांकडून शंभर रुपये आकारले जातात, असे सांगितले. त्यावर नगरसेवक अजिम पटवेगार यांनी भूभाडे वसूल करणाऱ्या ठेकेदाराकडून दादागिरी करत पैसे वसूल केले जात आहेत. याबाबतचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. सभागृहात त्याचे सादरीकरण करू, असे सांगितले. मात्र, त्याला सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांनी आक्षेप घेतला. सभागृहात कोणताही व्हिडिओ दाखवता येत नाही, असे सांगितल्यानंतर कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी देखील केएमसी अॅक्टनुसार सभागृहात व्हिडिओ दाखवता येत नाही, असे सांगितले.
नारळ विक्रेते, पाणीपुरी विक्रेते यांसह तत्सम प्रकारचे व्यावसायिक दिवसभर व्यवसाय करून त्यातून 400 रुपये उत्पन्न मिळवतात. मात्र, त्यापैकी दररोज शंभर रुपये भूभाडे वसुली करणाऱ्याला द्यावे लागत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यावसायिकांवर आर्थिक भुर्दंड येत आहे. दादागिरी करणाऱ्या भूभाडे ठेकेदारावर पोलिसात एफआयआर दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक अजिम पटवेगार यांनी केली. यापूर्वीच सभागृहाच्या मंजुरीनुसार शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आजच्या सभेतच या विषयाला मंजुरी दिल्यास बरे होईल. कारण, नवीन ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचणी येतील, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. पण यापूर्वीही अनेक महिने कर्मचारी वेतनापासून वंचित होते. त्यामुळे याचा यावेळी कोणताही परिणाम होणार नाही, असे विरोधी गटातील नगरसेवकांनी स्पष्ट केले.
पोलिसात गुन्हा दाखल करण्यास कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे महापौर मंगेश पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार म्हणाले, बळजबरी करून भूभाडे वसूल करणाऱ्या ठेकेदाराला कडक सूचना करावी. भूभाडे किती आहे, याची माहिती देणारे फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक, सरकारनियुक्त नगरसेवक उपस्थित होते.









