भाजपच्या सहकारी पक्षाचे निवडणूक आयोगाला पत्र
वृत्तसंस्था/ अमरावती
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या स्पेशल इंटेसिव्ह रिविजनवरुन (एसआयआर) राजकारण तापले आहे. निवडणूक आयोग पूर्ण देशात मतदारयादी पडताळणी करविण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. याकरता आयोगाने स्वत:च्या यंत्रणेला सक्रीय केले ओह. याचदरम्यान रालोआतील घटक पक्ष तेलगू देसम पक्षाने एसआयआर करविण्यावर आक्षेप घेतला आहे. एसआयआरची कक्षा स्पष्ट केली जावी आणि याला नागरिकत्व पडताळणीपासून वेगळे ठेवण्यात यावे असे तेदेपने म्हटले आहे. तेदेप खासदार लावु श्री कृष्ण देवरायलु यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेविषयी अनेक सूचना केल्या आहेत.
एसआयआरचा उद्देश केवळ मतदारयादीत सुधारणा आणि नव्या मतदारांना सामील करणे असावा. नागरिकत्वाची पडताळणी हा त्याचा उद्देश असू नये. या अभियानाला नागरिकत्व पडताळणी समजले जात असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील आहे. प्रशासकीय तयारी आणि मतदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी निवडणूक आणि एसआयआरदरम्यान पुरेसा कालावधी असायला हवा. निवडणुकीच्या 6 महिन्यांपूर्वी मतदारयादीची सखोल तपासणी करणे योग्य नाही. आंध्रप्रदेशात 2029 पूर्वी विधानसभा निवडणूक होणार नाही. अशास्थितीत राज्यात लवकरात लवकर एसआयआर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते असे तेदेपने म्हटले आहे.
तेदेपने निवडणूक प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक सूचनाही केल्या आहेत. दरवर्षी कॅगच्या अंतर्गत थर्ड पार्टी ऑडिट करविण्यात यावे. याचबरोबर मृत व्यक्ती आणि अन्य ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या लोकांची नावे मतदारयादीतून हटविण्यासाठी एआयचा वापर करण्यात यावा अशी सूचना तेदेपने पत्राद्वारे केली आहे. मतदानावेळी शाई लावून पडताळणी करण्याऐवजी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करविण्यात यावे. तर मतदारयादी आढावा प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल प्रतिनिधींना सामील करण्यात यावे असेही तेदेपकडून सुचविण्यात आले आहे.









