कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी, दोन्ही स्थानिक आमदारांकडे मांडली कैफियत
वाळपई : गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून सत्तरी तालुक्यातील अनेक भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार वाढले. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या मूलभूत गोष्टींच्या समस्येमुळे संबंधित खात्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पावसाळ्याच्या सुऊवातीलाच समस्या निर्माण झाल्यामुळे पुढील काळात समस्या आणखी तीव्र होण्याची भीती आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
पंधरा दिवसांपासून खंडित विजेची समस्या
वाळपई पालिका क्षेत्रासह संपूर्ण तालुक्यातच सातत्याने वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहे. अनेकवेळा तारा तुटणे, घालण्यात आलेला बंच केबल यामध्ये बिघाड होणे, अशा समस्या वाढू लागलेल्या आहेत. यामुळे सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत, सावर्डे पंचायत, म्हाऊस पंचायत, ठाणे पंचायत अशा वेगवेगळ्dया ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो. यावर उपाययोजना करण्यात सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. गेल्या आठ दिवसांपासून अडवई भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यासाठी भूमिगत वीजवाहिनी घालून नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बंच केबलचा दर्जा निकृष्ट!
तालुक्यात अनेक ठिकाणी बंच केबल हा निकृष्ट दर्जाचा आहे. यामध्ये सातत्याने बिघाड होत असतो. सदर केबलची दुऊस्ती करणारे तज्ञ कर्मचारी वीज खात्याकडे उपलब्ध नाहीत. सत्तरी तालुक्याच्या 80 टक्के भागामध्ये बंच केबलच्या माध्यमातून वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. मात्र अवघ्या वर्षातच या पंच केबलमध्ये बिघाड होऊ लागल्यामुळे तो निकृष्ट स्वरूपाचा असल्याचा आरोप नागरिकाकडून करण्यात येत आहे.
24 तास नको, किमान 4 तास तरी पाणीपुरवठा द्या!
राज्याचे सरकार सातत्याने गोव्यातील नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी देण्याच्या घोषणा करीत आहे. ही घोषण हवेतच विरली. त्यामुळे किमान 4 तास तरी सुरळीत पाणीपुरवठा करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बिले मात्र भरमसाठ
वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत असली तरी महिन्या अखेरीस येणारी बिले मात्र भरमसाठ असतात. हजारो ऊपयांची बिले नागरिकांना भरावी लागत आहे. या संदर्भात तक्रारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. देविया राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाणी, वीज समस्यांबाबत तडजोड नाहीच :आमदार डॉ देविया राणे.
पाणी, वीज समस्येबाबत आमदार डॉ देविया राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. पाणी व वीज नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. वीज खंडित होणे व त्याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्यावर होणे ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. या प्रश्नासंदर्भात आपण गप्प राहणार नाही, इशारा त्यांनी दिला आहे.
विशेष लक्ष देणार :आरोग्यमंत्री विश्वजित राणे
खंडित वीजपुरवठ्याचा फटका सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातील जनतेला बसत आहे. परिस्थिती खरोखरच गंभीर स्वरूपाची आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केलेली आहे. सत्तरी तालुक्यात भूमिगत केबल घालण्यासंदर्भाचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. त्यांना काही प्रमाणात मंजुरी मिळाली आहे. मात्र शिल्लक प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळावी, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार. या संदर्भात आपण संबंधित मंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे यांनी वीज आणि पाणी समस्येबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भाच्या तक्रारी संबंधित आमदारांकडे करण्यात आल्या आहेत. त्यांनी या संदर्भात विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती यावेळी त्यांन दिली.









