नूतन तहसीलदार बसवराज नागराळ यांची ग्वाही
प्रतिनिधी/ बेळगाव
तहसीलदार कार्यालयातील कारभार सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातील. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करून तक्रारींचा निवाडा करण्यात येईल, असे नूतन तहसीलदार बसवराज नागराळ यांनी सांगितले.
बेळगाव तहसीलदार सिद्राय भोसगी यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन तहसीलदार बसवराज नागराळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यापूर्वी त्यांनी बैलहोंगल तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे. बेळगावमध्ये आपण पहिल्यांदाच येत असून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार बसवराज नागराळ यांची नियुक्ती होताच तहसीलदार कार्यालयात अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या एजंटांनी जागा खाली केली आहे. तर कार्यालयाच्या आवारात होणारी बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठीही तात्काळ पावले उचलली आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या द्वारातून सरकारी वाहने ये-जा करण्यासाठी होणारी पार्किंगची अडचण दूर करून शिस्त लावण्याचा प्रयत्न तहसीलदारांनी केला आहे. त्यामुळे बसवराज नागराळ यांच्या शिस्तीबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला आहे. बेशिस्त पार्किंगला शिस्त लावणारे तहसीलदार कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार का? हे पहावे लागणार आहे.









