झटपट कॉलनी वसाहतमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी : इतर नागरी समस्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील झटपट कॉलनी वसाहतमधील सार्वजनिक नळांना कित्येक महिन्यांपासून पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच अनेक नागरी समस्यांकडेही ग्राम पंचापतीने दुर्लक्ष केल्यामुळे या वसाहतमधील रहिवाशांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज ताजे पाणी मिळावे तसेच इतर नागरी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंगळवारी रहिवाशांनी ग्रा. पं. वर धडक मोर्चा काढून ग्रा. पं. सेक्रेटरी सी. के. तळवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील ए ग्रेड ग्राम पंचायत म्हणून कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कडे पाहिले जाते. सदर पंचायतीमध्ये 13 वॉर्ड असून सदस्य संख्या 34 आहे. यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांनी प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये गावचा विस्तार मोठा असल्यामुळे सर्वानुमते नियोजनबद्ध शासकीय फंड वापरून विकास केल्यास तालुक्यातील एक आदर्श ग्रा. पं. म्हणून या पंचायतीकडे पाहिले जाईल. परंतु ग्रा. पं. निवडणुका होऊन जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी लोटला तरीही ग्रा. पं. सदस्यांना विकासापेक्षा ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलण्यातच अधिक रस दिसून येत आहे. मात्र, याचे दुष्पपरिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. हे सुद्धा दुर्दैव म्हणावे लागेत.
अनेक नागरी समस्या जैसे थे
झटपट कॉलनीमध्ये अनेक नागरी समस्या जैसे थे असल्याच्या तक्रारी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केल्या. या कॉलनीमध्ये पाण्याचे कोणतेच नियोजन नसल्यामुळे महिन्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. दैनंदिन पाण्यासाठी नागरिकांना खासगी विहिरी किंवा स्वत: पैसे भरून टँकर मागवून पाणी समस्या स्वत:च सोडवून घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच कॉलनीमध्ये रस्ते समस्या जैसे थेच आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारींची समस्याही जैसेथेच आहे. सदर वसाहतीकडे लोकप्रतिनिधी यांच्यासह ग्रा. पं. सदस्यही लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची अशा संतापजनक तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.
प्रथम पाणी द्या नंतर विकास करा
मंगळवारी ग्रा. पं. वर काढण्यात आलेल्या धडक मोर्चामधील नागरिकांची मुख्य मागणी सुरळीत पाणीपुरवठा करण्याची होती. आम्हाला प्रथम दररोज पाणीपुरवठा करा नंतर विकासकामे करा. पाण्यापेक्षा काही श्रेष्ठ नाही आहे, अशा भावनात्मक प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होताना दिसत होत्या.
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य गैरहजर
झटपट कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी व विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी ग्रा. पं. वर धडक मोर्चा काढला परंतु त्यांचे निवेदन स्वीकारण्यास ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य अनुपस्थित होते. दैनंदिन कामासाठी ग्रा. पं. मध्ये ठाण मांडून बसणारे अनेक ग्रा. पं. सदस्य मंगळवारी गैरहजर राहिल्यामुळे ग्रा. पं. कार्यालय सुणेसुणे होते. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्षच अनुपस्थित राहिले तर मोर्चेकरांनी आपल्या समस्यांचे निवेदन कुणाकडे द्यायचे असाही नाराजीचा सूर सुरू होता. शेवटी ग्रा. पं. चे शासकीय अधिकारी सेक्रेटरी सी. के. तळवार यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
ग्रा. पं. ला टाळे ठोकण्याचा इशारा
ग्रा. पं. वर काढलेल्या मोर्चावेळी झटपट कॉलनीतील नागरिक संतप्त झाले होते. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घेषणाबाजी करण्यात आली होती. ग्राम पंचायतीने येत्या चार दिवसांत आम्हाला मुबलक पाणीपुरवठा न केल्यास तसेच इतर नागरी समस्या त्वरित न सोडविल्यास पुढील वेळेस आम्ही ग्रा. पं. ला टाळे ठोकणार असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुरेश राठोड, बाबु दोडमनी, सदस्या भारता पाटील, अर्चना पठाणे, रेखा इंडीकर, सुचिता कोळी, सुवर्णा लंकेन्नावर, कल्लाप्पा अष्टेकर यांच्यासह नमीम मणियार, नूर मुल्ला, मन्सूर सलगर, वसीम हवालदार, नवीन मुल्ला, फरिदा हवालदारसह झटपट कॉलनीतील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
प्रथम आश्वासन नंतर पाठ : शकिरा बागेवाडी
निवडणुकीवेळी ग्रा. पं. सदस्य आम्हाला निवडून द्या तुम्हाला दररोज पाणीपुरवठा व सर्व नागरी समस्या सोडवू असे आश्वासन देऊन आमच्या मतावर निवडून येतात. नंतर मात्र आमच्याकडे पाठ फिरवतात. आम्हाला त्यांच्याकडे नागरी समस्यांसाठी जावे लागते परंतु याचे त्यांना काहीच सोयरसुतक नसते.
नळांचा पाणीपुरवठा बंद : रेश्मा मकानदार
अनेक महिन्यांपासून नळांना पाणीपुरवठाच केला नाही. आमच्या दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात. झटपट कॉलनीकडे ग्राम पंचायतीसह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागायची. आम्हाला प्रथम पुरेसे पाणी द्या नंतर या भागाचा विकास करा, असे त्यांनी सांगितले.
विकासकामांपेक्षा इतर बाबतीत अधिक रस : शोएब काझी
दैनंदिन जीवनात पाण्याला अधिक महत्त्व आहे. नागरी समस्या सोडविण्यापूर्वी प्रथम पाणी समस्या सोडविणे गरजेचे आहे. कंग्राळी ग्रा. पं. विकासकामांपेक्षा इतर बाबतीत अधिक रस घेत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या कॉलनीला प्रथम पाणी मिळणे हीच महत्त्वाची आमची भूमिका आहे. त्यामुळे तातडीने समस्या सोडवून दिलासा द्यावा.
समस्या न सोडविल्यास पंचायतीला टाळे : रिझवान दलवाई
आम्हाला दररोज पुरेसे पाणी मिळाले पाहिजे हीच आमची मुख्य मागणी आहे. या कॉलनीत दैनंदिन कामकाजामध्ये पाण्याला अधिक महत्त्व आहे. यासाठी दररोज ताजे पाणी मिळणे गरजेचे आहे. ग्रा. पं. ने येत्या आठ दिवसात पाणी समस्या सोडविली नाही तर आम्ही पंचायतीला टाळे ठोकून शासनाचा निषेध नोंदवू.
टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन : पीडीओ जी. बी. रंगाप्पगोळ
शासनातर्फे राबविण्यात येणारी जलजीवन योजनाही आम्ही लवकर पूर्ण करून घरोघरी पाणी देऊ. तोपर्यंत पाणी समस्येवर तोडगा म्हणून या कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सेक्रेटरी सी. के. तळवार म्हणाले, आम्ही सदर पाणी समस्येबद्दल जि. पं. च्या विशेष अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनीही आम्हाला जलजीवन योजना लवकर पूर्ण करून नागरिकांच्या पाणी समस्येला पूर्णविराम देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.









