उचगाव आरोग्य केंद्राला देवस्की पंचकमिटीची भेट
वार्ताहर/उचगाव
उचगावमधील नागरिकांच्या आरोग्या संदर्भात आणि आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत उचगावमधील देवस्की पंचकमिटीने उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच भेट दिली. या आरोग्य केंद्रासंदर्भात आणि नागरिकांच्या आरोग्य संदर्भात विचारपूस करून गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टरांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सूचना करण्यात आल्या. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास 17 गावे येतात. त्यामानाने उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जादा डॉक्टरची मागणी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नर्स यांची संख्या अतिशय कमी आहे. यामुळे या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची म्हणावी तशी देखभाल केली जात नाही.
यासंदर्भात उचगावमधील देवस्की पंचकमिटीने तातडीने भेट देऊन या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरची जादा नियुक्ती, नर्स, कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी यासाठी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच या आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश, रेबिज लस ह्या सर्व बाबी उपलब्ध आहेत की नाही, याचीही चाचपणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्याधिकारी स्मिता गोडसे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. स्मिता गोडसे यांनी अनेक रोगांवरील लसी उपलब्ध असून कोरोना संदर्भात प्राथमिक स्वरूपाच्या सूचना केल्या. याबद्दल नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, अशी त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवराज कदम, बी. एस. होनगेकर, अशोक हुक्केरीकर, संभाजी कदम, रामा कदम, बंडू पाटील, बाळकृष्ण तेरसे, एल. डी. चौगुले, मधुकर जाधवसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.









