कोरोनाबरोबरच उष्म्याचाही करावा लागतोय सामना : नागरिकांतून नाराजी
बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास होऊ लागला असून नागरिक उष्माघाताने आजारी पडू लागले आहेत. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याने खास सूचना प्रसिद्धीस देण्याची गरज असते. मात्र, ‘नागरिक हैराण आणि आरोग्य खाते सुस्त’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच उष्म्याची लाटही सहन करावी लागत आहे. त्यामुळे याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. सध्या उकाड्यापासून संरक्षणासाठी सुती कपड्यांचा वापर करावा. कपडे फिकट रंगाचे आणि ढिले असावेत. हाताला मिळेल अशा ठिकाणी पाणी ठेवावे, प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे, सतत पाणी पित राहावे, पाण्यामध्ये मीठ आणि साखर घालावी. जमल्यास फळांचे रस प्यावेत, चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करावे, सोडा व इतर रेडिमेड शीतपेये टाळलेलीच बरी, असे पर्याय दरवर्षी आरोग्य खाते देते. यावर्षी मात्र ते सुस्त झाल्याचे दिसून येत आहे.
अंगाला येणारा घाम मऊ सुती कापडाने पुसावा. ताक आणि नारळपाणी यांचा वापर जास्त करावा. पायात शक्यतो खुले चप्पल वापरावेत, एखाद्या व्यक्तीला उन्हाच्या त्रासाने गोंधळल्यासारखे झाले व तो असंबद्ध बडबडू लागल्यास त्याला सावलीत न्यावे, त्याला खाली झोपवून त्याचे पाय वर करावेत, थंड पाण्याने त्याचे कपाळ, मान, पाय आणि तळहात धुवावेत किंवा पुसावेत, थंड म्हणून बर्फ किंवा अतिशय थंड पाण्याचा वापर टाळावा, सदर व्यक्तीला मीठ, साखरमिश्रीत पाणी पिऊ द्यावे आणि जवळ डॉक्टर उपलब्ध असल्यास त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य खात्याने संबंधितांना सूचना करण्याची गरज असते. मात्र, आरोग्य खात्याच्या मनमानी कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अंगाला चिकटून बसतील असे कपडे घालणे टाळावेत, कुशनच्या खुर्च्या किंवा सोफ्यावर बसू नये. आपल्याला सहजरीत्या घेता येईल, इतक्याच अंतरावर पिण्याच्या पाण्याचा साठा करावा, तहान लागली की पाणी प्यावेच, त्यात टाळाटाळ करू नये, अंगावर जमलेला घाम पुसण्यासाठी खरबरीत कापडाचा वापर करू नये, अतिशय गरम, मसालेदार आणि मांसाहारी पदार्थ घेणे टाळावे, संपर्कातील व्यक्तीला उष्णतेने त्रास सुरू झाल्यास गोंधळून न जाता त्याला मदत करण्यासाठी काय करावे, हे सांगण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्य खाते दरवर्षीप्रमाणे उष्मा संपला की सूचना करणार यात काही संशय नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तेव्हा उष्मा संपण्यापूर्वीच सूचना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.









