सायबर केंद्रावर रांगा, शुल्कात एकसमानता नाही : सरकारने जागृती , दंडाची रक्कम कमी, मुदत वाढवून देण्याची मागणी
फोंडा: फोंड्यात सर्व सायबर केंद्रावर आधार-पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. 31 मार्च पुर्वी आधार-पॅन कार्ड लिंक न केल्यास दहा हजार रूपये दंड भरावा लागणार या भितीनेच नागरिकांमध्ये गेंधळ उडाला आहे. सद्या भरावा लागणारा एक हजार रूपयाचा दंडही सामान्य गरिब जनतेच्या खिशाला परवडेनासा झाल्याची प्रतिक्रिया येथे भेट देणाऱ्या नागरिकांनी दिली. आधार-पॅन कार्ड जोडणी करण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा. हजार रूपये दंड सामान्य गरिब जनतेला परवडणारा नसून तो शुल्क कमी करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची म्हणावी तशी जागृती सरकारने तसेच लोकप्रतिनिधीनी केली नसल्यामुळे हा मोठा गेंधळ उडाला आहे. आधार-पॅन लिंक करण्यासाठी आऊट सोर्सिग केल्यामुळेही सायबर केंद्राचा मनमानी कारभारही सद्या सुरू आहे. आपल्या मनात येईल तो दर सांगून मोकळे होत असल्याचे तक्रारी काही ग्राहकांनी केलेल्या आहेत. एक हजार रूपयांचा दंड भरल्यानंतर काहीजण तीनशे तर काहीजण दोनशे अशी शुल्काबाबत एकसमानता नसून मनमानी कारभार चालविलेला आहे.
सरकारने जागृती करावी, दंडाची रक्कम व मुदत वाढवून द्यावी
अंतिम मुदतीपैकी जेमतेम सहा दिवस शिल्लक असताना लोकांची धावपळ उडाली आहे. काहीं ग्राहकांना आपले आधार -पॅन कार्डाशी जोडणी झालेली आहे की नाही याबाबतच पक्की माहिती नाही. त्यानाही गर्दीशी झुंज देत उभे राहावे लागत आहे. खराब इंटरनेटचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. सद्या राज्यात कोरोनाने डोके वर काढलेले असून गर्दीच्या माहोलात थांबून अंतिम मुदत चुकल्यास त्यांचे पॅन कार्ड कायमचे निष्क्रीय होणार ही भिती ग्राहकांना सतावत आहे. प्रशासन तुमच्या दारी म्हणून गाजावाजा करणाऱ्या सरकारने नोटबंदीनंतर परत एकदा ज्येष्ठांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ आणलेली आहे. यावर त्वरीत मुदत वाढवून देण्यात यावी, महगांईत होरपळलेल्या जनतेला दंडाची रक्कम कमी करावी व सदर प्रक्रिया सुटसुटीत करावी अशी मागणी केली आहे.









