आधारकार्ड, मतदारकार्ड, जात-उत्पन्न दाखल्यांसाठी धडपड : स्पर्धा परीक्षांच्या अर्जासाठी ऑनलाईन सेंटरवरही गर्दी
बेळगाव : निवडणूक आणि स्पर्धा परीक्षा तोंडावर आल्याने विविध शासकीय कागदपत्रांची मागणी वाढली आहे. विशेषत: जात-उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदारकार्ड, रेशनकार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन आणि इतर ऑनलाईन केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. जात-उत्पन्नाचा दाखला आणि इतर शासकीय कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात पालक व विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. शिवाय निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदार ओळखपत्रासाठी 11 एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरणा सुरू आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र काढण्यासाठी नवीन मतदारांची धडपड सुरू आहे.
दुरुस्तींचे काम अधिक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्ड वितरणाचे काम ठप्प झाले आहे. मात्र रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरणा सुरू आहे. त्याचबरोबर रेशनकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्तीलाही वेग आला आहे. काही नागरिकांच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती आहे. नावात बदल, पत्त्यात बदल, तारीख, मोबाईल क्रमांकचा अभाव असलेले नागरिक दुरुस्तीसाठी बेळगाव वन कार्यालयात दाखल होऊ लागले आहेत. निवडणूक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये शासकीय कागदपत्रांसाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मात्र हेलपाटे सुरू झाले आहेत. विशेषत: ऑनलाईन सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. स्पर्धा परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. त्यामुळे वेळेत फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे.









