म्हसवड/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिका हद्दीतील म्हसवड -हिंगणी हा ब्रिटिशकाळापासूनचा रस्ता लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे करुन वाहतुकीस बंद केला असून पालिकेने तो पूर्वरत खुला करावा या मागणीसाठी नागरिकांनी म्हसवड पालिका कार्यालयातच आज दिवसभर ठिय्या आंदोलन करीत पालिकेने हा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करावा व संबंधित अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
गेली दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी नागरिक आंदोलने करीत आहेत. पालिकेसमोर उपोषणेही केली होती. दरम्यान, पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी या रसत्याची मोजणी करुन घेतली व त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यातील २० तारखेस हा रस्ता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढून वाहतुकीस खुला करुन देण्याचे लेखी आश्वासन नागरिकांना दिले होते.
आश्वासन देऊनही हा रस्ता आजतागायत खुला न केल्यामुळे माने वस्ती, कोले वस्ती येथील नागरिकांनी महिलांसमवेत आज सकाळी पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व घोषणा देत हा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी केली. आज सायंकाळी पाच वाजता मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांनी हा रस्ता उद्या सकाळी पोलीस बंदोबस्तात खुला करुन देण्याचे आस्वासन दिल्यानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले.