पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी : भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार, काम पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार
बेळगाव : अनगोळ उद्यमबाग रस्त्यावर असलेले चौथे रेल्वेगेट येथे भुयारी मार्ग करण्याचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अनगोळ-उद्यमबाग या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने म्हणजे तिसऱ्या रेल्वेगेटवरील उड्डाणपूल मार्गे वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिणामी नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून पर्यायी मार्गाची मागणी होत आहे. चौथे रेल्वेगेट येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन तसेच राज्य सरकारने घेतला आहे. आणि या कामासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक ही तिसरे रेल्वेगेटच्या उड्डाणपूल मार्गावरून वळविण्यात आली आहे. पण याचा सर्वात मोठा फटका अनगोळमधील नागरिक तसेच केएलई, उद्यमबाग, औद्योगिक वसाहत मजगाव तसेच संत रोहिदासनगर, ज्ञानेश्वरनगर, कलमेश्वरनगर व आसपासच्या नागरी वस्ती, हॉटेल, खानावळ, कारखानदार, रहिवाशांना बसला आहे.
येथील नागरिकांचा संपूर्ण व्यवहार हा अनगोळ बाजारपेठेवर अवलंबून असतो नागरिकांना दुधापासून ते भाजीपाला किराणा माल, दवाखानापासून ते छोट्या मोठ्या गोष्टींसाठी चौथे रेल्वेगेट ओलांडून अनगोळ येथे जावे लागते. यासाठी नागरिक दुचाकीचा वापर करत असतात. पण आता या रस्त्यावर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा रस्ता बंद झाल्यानंतर याचा सर्वाधिक फटका हा उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच दोन्ही बाजूच्या रहिवाशांना बसला आहे. अनगोळ, येळ्ळूर, वडगाव, धामणे आदी भागातून उद्यमबागकडे येणाऱ्या नागरिकांना हरिमंदिर, अनगोळ नाका, तिसरे रेल्वेगेट मार्गावरून उद्यमबागकडे जावे लागत आहे. तर पश्चिम भागातील संत ज्ञानेश्वरनगर, संत रोहिदासनगर, कलमेश्वर कॉलनी, विराट हॉटेलच्या बाजुला असलेली नागरी वसाहत, मजगाव, खादरवाडी, मच्छे आदी भागातील नागरिकांना व कामगारांना खानापूर रोड, बेम्को क्रॉसवरून तिसरे रेल्वेगेट, अनगोळ नाका, हरिमंदिर मुख्य रोड मार्गे अनगोळ येथे यावे लागत आहे. पाच-दहा मिनिटांच्या कामासाठी जवळपास दोन ते तीन किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. अनगोळ आणि उद्यमबाग हे अंतर अर्धा किलोमीटर पेक्षाही कमी आहे. परंतु आता नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे.
उड्डाणपुलावर रांगा, तर रस्त्यावर पार्किंग
अनगोळ-उद्यमबाग रस्त्यावरील चौथा रेल्वेगेट बंद झाल्याने नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून तिसऱ्या उड्डाणपुलाचा वापर करावा लागत आहे. सकाळी कामावर जाताना आणि परत येताना उड्डाणपुलावर प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. तर अनगोळ नाका येथे चारचाकी, टेंपो, ट्रक, मालवाहतूक वाहने वळविताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे अनगोळमध्ये प्रवेश करताना व बाहेर पडताना मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पहावयास मिळत आहे.
तर चौथे रेल्वेगेटपासून उद्यमबाग येथे जवळपास असलेल्या कारखान्यातील कामगार, दोन्ही बाजूंनी असलेले रहिवासी आपल्या छोट्या छोट्या कामासाठी गेटच्या दोन्ही बाजूला आपली वाहने उभी करून ये जा करताना पहावयास मिळत आहेत. या बंद गेटचा फटका खास करून रहिवासी नागरिक, शालेय, कॉलेज विद्यार्थी यांना बसत आहे. किराणा दुकान, दवाखाना, किंवा इतर कामासाठी आपली वाहने एका बाजुला उभी करून अनगोळ येथे चालत जावे लागत आहे.
शाळेची बस, कॉलेजची बस अथवा शाळेच्या वर्दी असलेल्या वाहनांचा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना चालत जावे लागत आहे. त्यामुळे या बंद गेटचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्याकडून होत आहे. किमान दुचाकी वाहने येण्याजाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची मोठी गैरसोय
प्रशासनाच्यावतीने जाहीर केलेल्या तारखेनुसार हा रस्ता एक वर्ष पूर्णपणे बंद केला जाणार आहे. पण यामुळे अनगोळ उद्यमबाग तसेच पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. अनगोळ येथील कांही शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी या चन्नम्मानगर, मंडोळी माळ, बक्काप्पाची वारी या भागात आहे आणि येथून शेतकरी रोज आपल्या जनावरांना वैरण घेऊन येत असत आणि शेतीची कामे करण्यासाठी आपली वाहने बैलगाडी घेऊन जात असत पण आता हा रस्ताच बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.









