बेळगाव : सरकारकडून नागरिकांना मोफत वीज दिली जात असली तरी शहरात होणारा विजेचा खेळखंडोबा पाहता ‘मोफत वीज नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. टिळकवाडी परिसरात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, नागरिक वैतागले आहेत. तक्रार निवारण केंद्रातील फोन बंद असल्याने तक्रार करायची तरी कोणाकडे? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. शहरातील एक उच्चभ्रू नागरिकांची वसाहत म्हणून टिळकवाडी परिसराची ओळख आहे. मागील आठ दिवसांपासून या भागामध्ये पूर्वसूचना न देता हेस्कॉमकडून वीजपुरवठा बंद केला जात आहे. सोमवारपेठ, मंगळवारपेठ, गुरुवारपेठ या परिसरात तर विजेची सतत समस्या असून, अधिकारीवर्गाची डोळेझाक सुरू आहे. कार्यालयात जाऊन विचारणा केली असता सध्या कर्मचारी नाहीत. आल्यावर पाठवून देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांनाही विजेचा फटका
कोरोनानंतर वर्क फ्रॉम होमची संकल्पना वाढली असून बरेचसे तरुण घरातूनच काम करत आहेत. परंतु, त्यांना 24 तास सलग वीजपुरवठा गरजेचा असतो. परंतु, विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांनाही विजेचा फटका बसत आहे. हॉटेल, लघुउद्योजकांनाही वीज नसल्यामुळे काम बंद ठेवावे लागत असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.
गोवावेस येथील कार्यालयातील फोन बंद
गोवावेसपासून उद्यमबागपयर्तिंच्या परिसरासाठी गोवावेस येथे हेस्कॉमचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये एक दूरध्वनी क्रमांक असून, यावर नागरिक आपल्या तक्रारी मांडत असतात. परंतु, मागील अनेक दिवसांपासून कर्मचारी फोनच उचलत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. बऱ्याचवेळा फोन बाजूला काढून ठेवण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी फोन कोणाला करायचा? असा प्रश्न नागरिकांसमोर असतो.









