ऑनलाईन टीम / मुंबई :
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. काल दिवसभर दुर्घटनास्थळी असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी अनुभव कथन करताना त्याभागातील परिस्थिती किती बिकट आणि धोकायदायक होती याची माहिती दिली. इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. त्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. आज सकाळपासून इर्शाळवाडी येथे शोध कार्यास सुरूवात झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी धोका आहे, अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.