पाणी विकत घेवून उदरनिर्वाह करण्याची नागरिकांवर वेळ
वार्ताहर/ धामणे
मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील नागरिकांचे हाल सुरू असून पाणी विकत घेवून उदरनिर्वाह करण्याची वेळ या दोन्ही गावातील नागरिकांवर आली आहे.
धामणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मासगौंडहट्टी व देवगणहट्टी या दोन्ही गावांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे येथील नागरिक तीन ते चार घरातील कुटुंब मिळून दोन दिवसातून एकदा एक पाण्याचा टँकर विकत घेवून घरात आणि जनावरांना पाणी वापरले जात आहे. कारण या दोन्ही गावांमध्ये बऱ्याच कूपनलिकांची खोदाई करण्यात आली. परंतु खोदाई करण्यात आलेल्या कूपनलिकांना पाणी लागेना. यापूर्वी या दोन्ही गावांसाठी विहीर खोदण्यात आली होती. परंतु या विहिरीतील पाणी पावसाळा संपताच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाणी कमी होते.
ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी गाठला तळ
यंदा पावसाळा कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातच या विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठले आहे. मासगौंडहट्टीला गावच्या वरच्या बाजूला असलेल्या झऱ्याचे पाणी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत रहात होते. परंतु यंदा पावसाचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे झऱ्याचे पाणी बंद झाले. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या उद्भवली आहे. नुकताच धामणे गावातील दोन्ही मंदिरांचा उद्घाटन सोहळा चार दिवस पार पडला. त्या चार दिवसात 22 टँकर पाणी धामणे ग्रामपंचायतकडून करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील, उपाध्यक्ष अशाक पाटील, सदस्या पार्वती बसरीकट्टी व सदस्या रेणुका मेलगे यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा केल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याची गरज
यापुढे अजून मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाच महिने पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्यावतीने तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवून या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवून ग्रामपंचायतला सहकार्य करण्याची विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
धामणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील या दोन्ही हट्ट्यांची लोकसंख्या अडीच हजार असून प्रत्येकवर्षी उन्हाळ्यामध्ये येथेही पाणी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासून या समस्येमुळे त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायतने पुढाकार घेवून जिल्हा पंचायत आणि या भागाच्या लोकप्रतिनिधींना भेटून पाण्याची ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.









