मनपा आयुक्तांना रहिवाशांचे निवेदन
बेळगाव : भवानीनगर, मंडोळी रोड येथील जोशी पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये रस्ता, पाणी, ड्रेनेज या समस्येबाबत येथील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी या परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मंडोळी रोड येथील या वसाहतीमध्ये रस्ते अर्धवट झाले आहेत. पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जात नाही. ड्रेनेजची समस्या तर गंभीरच आहे. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा तातडीने या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
महानगरपालिकेमध्ये हा भाग समाविष्ट करण्यात आला असला तरी महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा तातडीने याची दखल घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. ड्रेनेजची समस्या वारंवार भेडसावत असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गटारीअभावी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. या कॉलनीला वीस वर्षे उलटली तरीदेखील सोयी-सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्षच झाले आहे. तेव्हा त्वरित या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रसाद पाटील, प्रसाद पंचाक्षरीमठ, राहुल कुलकर्णी, प्रभाकर गुंजीकर, रेमाणी मन्नोळकर, काडाप्पा होसमनी, आकाश शिंदे, उषा पाखरे, रुपा दड्डीकर यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होत्या.









