पालिकेत आलेल्या मोजक्या लोकांची वारी फुकट, नगरसेवकांची नाराजी कारणीभूत असल्याचे संकेत
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता नागरिकांकडून सल्ले व सूचना घेण्यासाठी बोलावलेली सोमवारची बैठक शेवटी रद्द करण्यात आली. मुख्याधिकाऱयांना पणजीत बैठक असल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आशय असलेली नोटीस पालिका सभागृहाच्या दरवाजावर लावण्यात आली होती. सदर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काही नागरिक उपस्थित होते. सदर नोटीस वाचून ते माघारी फिरले. यातील काही जणांनी बैठक रद्द झाल्याचे आधी कळले असते, तर आम्हाला फुकटचा फेरफटका पडला नसता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सदर बैठकीचे आपणास मुख्याधिकारी कदम यांनी क्रांतिदिनी लोहिया मैदानावर भेट झाली असता आमंत्रण दिले होते. परंतु बैठक रद्द झाल्याचे येथे आल्यावर कळले. शहराबद्दल नागरिकांकडून मते घेण्यात कोणतीही चूक नाही. मात्र राजकारण्यांनी आम्हाला फक्त मतदानापुरते मर्यादित ठेवले आहे, असा संताप विनायक मोर्डेकर या मडगावातील ज्येष्ठ नागरिकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुख्याधिकाऱयांनी नागरिकांकडून सल्ले घेण्यासाठीची बैठक बोलाविण्यापूर्वी नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे होते. नगरसेवक विश्वासात न घेतल्याने नाराज असल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्तांतून वाचनात आले. त्यामुळे बैठक रद्द झाली की काय ते कळले नाही, अशी प्रतिक्रिया बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या कार्लुस ग्रासियस यांनी दिली.
ग्रामसभेच्या धर्तीवर पालिकेत बैठक हवी
आपण वाहतूक तसेच मडगाव शहराला भेडसावणाऱया अन्य समस्यांसंदर्भात एक अहवाल तयार करून 2014 साली स्थानिक आमदार तसेच नागरी प्रशासनाला सादर केला होता. परंतु त्यातील अवघेच प्रश्न मार्गी लागले, तर बहुतेक तसेच आहेत, असे मोर्डेकर यांनी सांगितले. मोर्डेकर व ग्रासियस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पंचायतीच्या ग्रामसभेप्रमाणे पालिकेत बैठक बोलाविण्याची गरज व्यक्त केली. मात्र त्यासाठी सरकारला कायद्यात आवश्यक तरतुदी कराव्या लागतील असे सांगण्यात आले. सदर बैठक पुढे ढकलण्यात येत आहे असा नोटिसीत उल्लेख नसून सरळ रद्द करण्यात आल्याचा उल्लेख असल्याने ती यापुढे बोलाविली जाईल की नाही याबद्दल नागरिकांनी साशंकता व्यक्त केली आहे.
नगरसेवकांच्या नाराजीमुळे बैठक रद्द ?
दरम्यान, बैठक रद्द झाल्याबद्दल नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांची प्रतिक्रिया जाणली असता आपण वालंकिणी वारीवर असल्याने या बैठकीची आपणास जाण नव्हती, असे त्यांनी सांगितले. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेतले गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने सदर बैठक रद्द करत असल्याचे मुख्याधिकाऱयांनी आपणास म्हटले होते, असे पेरेरा यानी सांगितले.
मुख्याधिकारी कदम यांनी पालिका क्षेत्राला भेडसावणाऱय?ा समस्यांवर नागरिकांची मते व सल्ले ज?ाणून घेण्यासाठी बैठक बोलविली असता यासंदर्भात नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याने तसेच या बैठकीचे त्यांना आमंत्रण नसल्याने कित्येक नगरसेवकांकडून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला होता. पालिकेत लोकांनी निवडून दिलेले मंडळ असताना त्यांना विश्वासात न घेता व शहराला भेडसावणाऱया समस्यांवर मंडळाशी चर्चा न करता सरळ नागरिकांकडून सल्ले मागण्याची आवश्यकता आहे काय, असा सवाल काही नगरसेवकांनी केला होता. मुख्याधिकाऱयांनी याखेरीज प्रत्येक प्रभागातून दोन नागरिकांची नावे स्वयंसेवक म्हणून द्यावीत असा एक संदेश पालिकेचे नगरसेवक सदस्य असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपवर टाकल्याने नाराजी वाढली होती. नगरसेवकांना भेटून सविस्तरपणे सांगून मुख्याधिकारी निर्णय का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. निर्णय लादण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना, असाही नगरसेवकांचा समज झाला होता.
बैठक रद्द होणे दुर्दैवी : कुतिन्हो
मुख्याधिकाऱयांनी बोलाविलेली बैठक रद्द झाल्याने निराशा व्यक्त करताना शॅडो कौन्सिल ऑफ मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, ही नागरिकांची बैठक शेवटच्या क्षणी रद्द करणे हे खरोखरच दुर्दैवी आहे. रद्द करण्यामागची कारणे केवळ उघडच नाहीत, तर सार्वजनिकही आहेत. मीडिया रिपोर्ट्स ठळकपणे सांगतात की, नगरसेवक आणि आमदार नागरिकांची बैठक घेण्यासाठीच्या हालचालींवर नाराज होते. नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची मतदारांनी एकदा निवडून दिल्यावर ते शहराचे सर्वेसर्वा आहेत अशी धारणा असू शकते. तथापि, शहराच्या कल्याणासाठी नागरिकांच्या सहभागाबाबत त्यांची असुरक्षितता एक स्पष्ट संकेत देते. त्यांना पारदर्शकतेची भीती वाटते आणि त्यांच्याकडे लपवण्यासारखे बरेच काही आहे, असे ते पुढे म्हणाला.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्या सर्वांसह ही बैठक घ्यायची असेल, तर ते आमच्यासाठी स्वागतार्ह असेल. मुख्याधिकाऱयांसमोर मुद्दे मांडणे आणि नंतर त्यांनी पालिका मंडळासमोर सूचना मांडणे हा एक लांबचा मार्ग आहे. शक्य तितक्या लवकर अशी सामान्य बैठक घेण्याचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.









