पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव :
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी नदी, नाले, तुंडूंब भरून वाहत आहेत. हवामान खात्याने 19 व 20 रोजी बेळगाव जिल्ह्याला ऑरेंज अर्लट दिला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय व मलप्रभा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. हिडकल जलाशय पूर्णपणे भरले असून दररोज हजारो क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यापूर्वीच 25 हजारहून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
हिरण्यकेशी, मार्कंडेय बळ्ळारी नाल्यातून 40 हजार क्युसेक्स पाण्याची हिडकल डॅम जलाशयात आवक होत आहे. यामुळे पुराचा धोका आणखी गंभीर झाला आहे. परिणामी अनेक पूल, बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले. नदीकाठावर राहणारे शेतकरी व नागरिकांनी वाढत्या प्रवाहाची गंभीर दखल घेऊन आपला जीव धोक्यात घालू नये. यामुळे विलंब न करता नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे. कृष्णा व हिरण्यकेशी नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिकप्रमाणात वाहत आहेत. यामुळे पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी किंवा पर्यायी मार्गाने नागरिकांनी प्रवास करावा, असे ते म्हणाले.
आपण जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन दलाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवत आहे. नागरिकांची सुरक्षितता हीच आमची पहिली प्राथमिकता आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी मुले, वृद्ध व महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. यापुढेही असाच पाऊस बरसत राहिल्यास शाळांना सुट्टी दिली जाईल. अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.









