शहर तापतेय, पारा वाढतोय, शरीराचीही होतेय लाहीलाही : शितपेयांकडे वाढला नागरिकांचा कल
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शहराचा पारा 39 अंशाहून पुढे गेला आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शितपेयांनाही मागणी वाढत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
एप्रिल महिन्यापासून वळीव सातत्याने हजेरी लावत असला तरी उष्म्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळय़ात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, कलिंगड, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आईस्क्रिम ज्यूस यासारख्या शितपेयांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारच्या वेळेत शरीरातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिकांना एसी आणि फॅनचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान दुपारच्या उन्हात रस्त्यावरील रहदारी कमी होत आहे. तर काही ठिकाणी रस्ते ओस पडू लागले आहेत.
मागील काही दिवसात उष्म्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पाराही अधिक प्रमाणात वाढल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी बाजारात येणाऱया नागरिकांना झाडाखाली किंवा दुकानात आसरा घ्यावा लागत आहे. शिवाय संध्याकाळी बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.
वाढत्या उन्हाने बाजारपेठेतील सकाळी 11 ते 5 या वेळेत होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. शिवाय वाढत्या उष्णतेमुळे आजारही वाढू लागले आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर वन्यप्राण्यांचे दर्शन
उन्हाच्या वाढत्या कहरामुळे वन्यप्राणी सैरभैर झालेले पहायला मिळतात. वन्य प्रदेशात पाणी आणि खाद्याच्या तुटवडय़ामुळे वन्यप्राणी शिवारात आणि रस्त्यावर दिसू लागले आहेत. वाढत्या उन्हाचा फटका मानवाबरोबर वन्यप्राण्यांनाही बसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून बेळगाव-चोर्ला मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाढत्या उन्हाळय़ामुळे वन्यप्रदेशात पाण्याचा आणि खाद्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राणी सैरभैर होताना दिसत आहेत.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील डोंगर भागात गवीरेडे, रानडुक्कर, साळींद्र, तरस आणि मोरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, डोंगर भागात वन्यप्राण्यांना पाणी आणि गवत उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राणी थेट शिवारात उतरत आहेत. त्यामुळे शेतकऱयांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या उन्हामुळे डोंगरभागात पाणी आणि ओल्या चाऱयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी शिवारात आणि रस्त्यावर निदर्शनास येत आहेत. दरम्यान, शिवारातील पिकांचे नुकसानही वन्यप्राण्यांकडून होत आहे. मागील आठवडय़ात गव्यांचा कळप उचगाव-कोवाड मार्गावर प्रवाशांना निदर्शनास आला होता. त्यानंतर तरसाचेही दर्शन झाले होते. त्यामुळे प्रवाशांमध्येही भीती निर्माण झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडत आहेत. त्यामुळे ते निदर्शनास येत असल्याचेही वनविभाग सांगत आहे.









