कोणतीही पूर्वकल्पना न देताच जेथे तेथे बॅरिकेड्स लावून रस्ते बंद : प्रशासनाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
बेळगाव : गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहराची ओळख आता बॅरिकेड्सचे शहर म्हणून रुढ होणार आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या शहरामध्ये नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जेथे तेथे बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले जातात. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स तर गेल्या चौदा वर्षांपासून हटविण्यात आलेले नाहीत. परंतु, अलीकडे वेगवेगळ्या कारणास्तव सातत्याने मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्तेसुद्धा बॅरिकेड्स लावून अचानक बंद केले जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहराच्या क्षेत्रफळापेक्षा लोकसंख्या वाढली आहे. त्याच्या दुप्पट किंवा तिप्पटसुद्धा वाहने वाढली आहेत. मात्र पार्किंगसाठीचे योग्य नियोजन नाही. घरटी दोन ते तीन वाहने असल्याने बाजारपेठेत आल्यानंतर वाहने पार्क कोठे करायची? हा प्रश्न निर्माण होतो. जेथे जागा मिळेल तेथे वाहने पार्क केल्याने वाहतुकीचे नियोजन चुकते, गर्दी वाढू लागते. शेवटी पोलीस बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना रोखण्याचा प्रयत्न करतात. परंतु, यामुळे गैरसोयीत भर पडते. अचानक बॅरिकेड्स लावल्याने वाहनधारकांना उलटा वळसा पडतो. त्यामुळे जवळपास असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी पाच मिनिटांऐवजी किमान अर्धा तास लागतो. यामुळे वेळेचा अपव्यय होतो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. विविध साहित्यांच्या खरेदीसाठी लोक शहराकडे येत आहेत. यामुळे शहर परिसरातही नागरिकांची वर्दळ वाढली असून बाजारपेठाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र विविध कारणांनी राणी चन्नम्मा चौकसह इतर मार्ग बंद करण्यात येत आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या खरेदीला येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. विविध खरेदी व इतर कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने शहराकडे येत आहेत. दिवाळीनिमित्त दागिने, कपडे, सजावटीच्या वस्तू, आरती, पणती, आकाशकंदील, पूजेचे साहित्य व बाजारासाठी येत आहेत. यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. शहर परिसरात नागरिकांसह वाहनांचीही वर्दळ जास्त होत आहे.
नागरिकांमध्ये निराशा
निवडणूक, आंदोलन, विविध कार्यक्रम आदी कारणांमुळे राणी चन्नम्मा सर्कल व इतर मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले जातात. तसेच सदर मार्गांवरून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाते. मात्र विविध कामांसाठी व खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना याची कल्पना नसल्याने त्यांची हेळसांड होते. परिणामी वेळेचा अपव्यय होऊन त्यांना अनेक समस्यांना तेंड द्यावे लागते. ऐन सणासुदीला अशा प्रकारच्या समस्या आल्या की नागरिकांमध्ये निराशा पसरत असल्याचे चित्र आहे.









