रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांतून नाराजी : लोखंडाच्या सळीचा वापर न करताच काँक्रिटीकरण :आवाज उठवण्याची मागणी
खानापूर : एकात्मक विकास योजनेतून राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. रुमेवाडी ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना लोखंडाच्या सळीचा वापर अजिबात करण्यात येत नसून, सिंमेट काँक्रीट घालून पसरवण्यात येत आहे. या काँक्रिटीकरणाचाही दर्जा अंत्यत सुमार असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय नेत्यानी याबाबत आवाज उठवण्यात यावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. करंबळ क्रॉस ते राजा टाईल्सपर्यंतचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत होता.
मात्र महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या विकासासाठी 14 कोटीचा निधी मंजूर करून हा रस्ता बांधकाम खात्याकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे. कंत्राटदाराने या रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापूर्वी सुरू केले आहे. मासळी मार्केटजवळील सीडीचे काम सुरू होते. या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर या ठिकाणचे काम बंद केले आहे. रुमेवाडी क्रॉसनजीकच्या दुसऱ्या सीडीचे काम हाती घेऊन करंबळ क्रॉस येथून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरवात केली आहे. गेल्या चार दिवसापासून रस्त्यावर काँक्रीट घालण्याचे काम सुरू आहे. मात्र काँक्रिटचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र आक्षेप नेंदवला आहे. याबाबत नागरिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याना याबाबत माहिती दिली आहे.

काँक्रीटबाबत सांशकता
कामाबाबत योग्य नियोजन नसल्याने सध्या अस्तित्वात असलेला रस्ता उकरुन त्याच्यावरच काँक्रिटीकरण घालण्यात येत आहे. काँक्रीट मिश्रणचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ज्या ठिकाणी काँक्रीट घालण्यात आले आहे. त्या ठिकाणची खडी पसरुन बाहेर पडत आहे. त्या काँक्रिटीकरणावर पाणीही मारण्यात येत नसल्याने काँक्रीटबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे.
श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्षात चढाओढ
या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यात 4.3 कि. मी. चा रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. यात नदी पुलापासून ते मऱ्याम्मा मंदिर हा 1.25 एवढा रस्ता दुपदरीकरणाचा आहे. बाकी फक्त पाच मीटरचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये गेल्या महिन्याभरापासून चढाओढ सुरू आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून याबाबत कोणताही आवाज उठवण्यात येत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याचा विकास महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला असता तर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले असते अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
श्रेय लाटण्यासाठी रस्त्याच्या कामाचे पुन्हा पूजन
गेल्या महिन्याभरात रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे मासळी मार्केटजवळील काम थांबवण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशातच पुन्हा गुरुवारी भाजपकडून खासदार विश्वेश्वेर हेगडे-कागेरी यांच्या हस्ते शिवस्मारकजवळील चौकात पुन्हा रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात आले. मात्र रस्त्याच्या दर्जाबाबत काहीही चर्चा करण्यात आली नसल्याने फक्त श्रेय लाटण्यासाठीच पूजन होते का, असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे.









