अनेकवेळा आवाज उठवूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा इशारा
वार्ताहर /नंदगड
खानापूर शहरापासून जवळच असलेल्या शेडेगाळी क्रॉस ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाला असून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून अनेकवेळा आवाज उठवूनही दुरुस्ती होत नसल्याने आता आंदोलन करण्याचा इशारा या भागातील जनतेने दिला आहे. रुमेवाडी क्रॉसपासून हेम्माडगा ते अनमोडपर्यंतचा हा रस्ता आहे. या रस्त्यापैकी शेडेगाळी क्रॉस ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्यात अनेक मोठमोठे ख•s पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरच चऱ्या पडल्या आहेत. खानापूरपासून अनमोडमार्गे गोव्याला जाणारा हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. रुमेवाडी, शेडेगाळी, हारुरी, मणतुर्गा, नेरसा, अशोकनगर, शिरोली, तिवोली, हेम्माडगा, डोंगरगाव, अबनाळी आदी गावातील जनता याच रस्त्यावरुन खानापूरला येते. शिवाय या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी व सायकलवरुन ये-जा करतात. या रस्त्यावरुन जाताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे हाल होत आहेत. वाहने बंद पडत आहेत. रस्त्याअभावी वडाप वाहने कमी झाल्याने प्रवासीवर्गाचीही गैरसोय होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून अनेकवेळा आवाज उठविण्यात आला. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे आता या भागातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोकोच्या माध्यमातून आंदोलनाचा मार्ग हाती घेतला आहे.
रस्त्यासाठी आंदोलन हाच एकमेव पर्याय
शेडेगाळी क्रॉस ते मणतुर्गा कत्रीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, म्हणून लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु यासंबंधी केवळ आश्वासनच मिळत आहे. आता आमची सहनशक्ती संपली असून या भागातील जनतेला घेऊन लवकरच रास्ता रोको करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे मणतुर्गा यांनी दिला आहे.









