चोरटे हाती सापडताच करताहेत धुलाई, पोलिसांची मात्र ढिलाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांपाठोपाठ ग्रामीण भागातही चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस दलाला म्हणावे तसे यश येईना. अनेक आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेळगावातून पळाले आहेत. त्यांचा शोध घेणे आता कठीण जात आहे. या परिस्थितीमुळे गावोगावी नागरिकच सजग झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोटारसायकलवरून येऊन चोरी करणाऱ्या आझमनगर-बेळगाव येथील दोन तरुणांना रंगेहाथ पकडून स्थानिक नागरिकांनी त्यांची धुलाई केली आहे. त्यानंतर त्यांना मारिहाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या पंधरवड्यातील दोन घटना लक्षात घेता आता नागरिकच खबरदार झाल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी 25 रोजी विघ्नेश्वर कॉलनी, पार्वतीनगर परिसरात एका विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला होता. नागरिकांच्या हातात सापडण्याआधी तब्बल आठ दिवस या तरुणाने परसात वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रs चोरण्याचा सपाटाच सुरू केला होता. स्थानिक नागरिकांनी पाळत ठेवून त्याला पकडले होते.
पार्वतीनगर व मुचंडी येथे घडलेल्या दोन घटना लक्षात घेता वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे हैराण झालेले नागरिकच आता सतर्क झाले असून चोरी करताना नागरिकांच्या हातात सापडणाऱ्या गुन्हेगारांना चोपण्यात येत आहे. दिवसा व रात्री चोऱ्यांचा सपाटा सुरूच आहे. आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांबरोबरच स्थानिक गुन्हेगारही सक्रिय आहेत.
गावोगावी नागरिकच सजग
गेल्या महिन्यात शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात धुमाकूळ घालणारा गुन्हेगार आनंदनगर, वडगाव परिसरात पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. मात्र, अत्यंत सहजपणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पलायन केले असून त्याला पकडण्यासाठी बेळगाव पोलिसांचे एक पथक तब्बल दोनवेळा सोलापूरला जाऊन आले. तरी त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे गावोगावी नागरिकच सजग झाल्याचे या दोन घटनांवरून दिसून येत आहे.









