वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावच्या पश्चिमेकडील शिवारातून जाणाऱ्या ओढ्यावरील काळाकट्टा पुलावर ग्रा. पं. च्या वतीने खडी, माती टाकून शेतीकडे जाण्यासाठी रस्ता सुरळीत केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावरुन पाणी गेल्याने दगड, माती वाहून गेली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबर महिलांची शेताकडे जाताना गैरसोय होत होती. यासाठी ग्रा. पं. ने तातडीची बैठक बोलावून ग्रा. पं. च्या निधी दोन मधून आगाऊ रक्कम मंजूर करून घेतली व पुलावर दगड, माती टाकून शेतकरी वर्गाला पुलावरुन शेताकडे ये-जा करणे सोईचे केले आहे. सध्या भातरोप लागवडीची कामे जोमात असल्याने पावर ट्रेलर, ट्रॅक्टर शेताकडे नेणे सोयीचे झाले आहे. ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य प्रशांत पाटील, कंत्राटदार महेश पाटील यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
पुलावर काँक्रिटीकरण करणार
सध्या या पुलावर खडी, माती टाकली असली तरी येत्या आठवड्यामध्ये सदर पुलावरील वाटेवर काँक्रिटीकरण करून पावसाळ्यामध्ये प्रत्येक वर्षी होणारी अडचण दूर करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.









