वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील एटीएम सेवा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील कोणत्याही एटीएम केंद्रावर पैसे उपलब्ध नसल्याने सध्या एटीएम केंद्रांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. येथे एसबीआयच्या दोन एटीएमसह अन्य बँकांची मिळून सहाहून अधिक एटीएम केंद्रे आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून येथील एटीएम सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपवाद वगळता कुठल्याच एटीएम केंद्रामध्ये पैसे उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील एटीएम केंद्रावर पैसे उपलब्ध नसल्याने नागरिकांना एक तर इतर गावच्या एटीएमला जावे लागत आहे किंवा शहर गाठावे लागत आहे. अशाने नागरिकांची धावपळ होत आहे. संबंधितांनी येथील एटीएम सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









