कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे समस्या : ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून
प्रतिनिधी/ बेळगाव
कचऱ्याची उचल करताना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा फतवा महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी काढला आहे. मात्र कचरा देणाऱ्याकडून वर्गीकरण केले जात नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागत आहे. त्यामुळे कचऱ्याची उचल करण्यास विलंब होत असल्याने रविवार दि. 29 रोजी बाजारपेठेसह ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले होते. त्यामुळे गणपत गल्लीसह शहर कचऱ्याने तुंबल्याचे चित्र निर्माण झाले होते.
महापालिका आयुक्त म्हणून शुभा बी. यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेतील कामकाजाला शिस्त लावण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विशेष करून त्यांनी कचरा समस्येकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सकाळच्या वेळी शहरात फेरफटका मारत स्वत: ठिकठिकाणी भेटी देऊन कचरा उचल कशा पद्धतीने केली जात आहे, याची पाहणी त्या करत आहेत. तसेच तुरमुरी कचरा डेपोलाही भेट देऊन पाहणी करण्यासह माहिती घेत आहेत.
अलीकडेच त्यांनी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घेण्याची सूचना सफाई कर्मचाऱ्यांना केली आहे. मनपा आयुक्तांनी काढलेल्या फतव्याची कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. पण कचरा देणाऱ्याकडून सुका आणि ओला कचरा वर्गीकरण करून देण्याऐवजी एकत्र दिला जात आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. जमा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास विलंब लागत असल्याने गोळा केलेला कचरा सफाई कर्मचारी एकत्र करून त्यानंतर त्याचे वर्गीकरण करत आहेत. परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडत असून मिनी कचरा डेपो निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत कचऱ्याची उचल केली जात होती. मात्र आता वर्गीकरण करावे लागत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच पडत आहेत.
दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ
रविवारी तर ही समस्या अधिकच गंभीर बनली होती. गणपत गल्लीसह शहराच्या मुख्य बाजारपेठेत सफाई कर्मचाऱ्यांनी जमा केलेला कचरा एकत्र केला. त्यानंतर सुका आणि ओला कचरा वर्गीकरण करून तो वाहनात भरला जात होता. या सर्व प्रक्रियेला उशीर लागत असल्याने रविवारी शहर अक्षरश: कचऱ्यात तुंबल्याचे चित्र दिसून आले. एकंदरीत शहरवासियांना कचऱ्याच्या समस्येला तोंड देत दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली. तसेच पादचारी आणि वाहनचालकांना कचऱ्यातून वाट शोधावी लागली. कचरा देणाऱ्यांनीच सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून दिल्यास भविष्यात ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. अन्यथा कचऱ्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.
गणपत गल्लीत मुख्य रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग
गणपत गल्ली ही शहरातील मुख्य बाजारपेठ असून त्याठिकाणी फळविक्रेते, फुलविक्रेते, भाजीपाला विक्रेते यासह इतर प्रकारची व्यापारी आस्थापने आहेत. त्यामुळे त्याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. रविवारी कलमठ रोड, पांगूळ गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक याठिकाणीही मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडला होता. कचरा टाकणाऱ्यांकडून त्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने सफाई कर्मचारी गोळा केलेला कचरा एकत्र करून त्याचे वर्गीकरण करत होते. त्यामुळे रविवारी गणपत गल्लीत मुख्य रस्त्याच्या मधोमधच कचऱ्याचे ढीग पडले होते.









