वृत्तसंस्था/हैदराबाद
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)कडे एक समर्पित अग्निशमन विभाग आहे. याच्याच अंतर्गत सीआयएसएफकडून एक राष्ट्रव्यापी अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन केले जात आहे. सीआयएसएफने 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 150 शहरांमध्ये 380 अग्निशमन कर्मचाऱ्यांना रासायनिक युद्ध आणि जैविक धोक्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम आधुनिक अग्निशमन आणि बचाव तंत्रज्ञानांसोबत महत्त्वपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कौशल्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. घनदाट लोकसंख्या असलेली शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक आपत्कालीन स्थितींसाठी तयारी आणि रासायनिक युद्ध एजंट्सना हाताळण्यासारख्या अत्याधुनिक विषयांना सामील केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीआयएसएफला अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची विशेष जबाबदारी सोपविली होती. यानंतर सीआयएसएफने राज्य अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला. सीआयएसएफने हैदराबादच्या अग्निशमन सेवा प्रशिक्षण संस्थेत 11 तुकड्यांचे आयोजन केले, ज्यात 113 शहरांच्या 274 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्रदान करण्यात आले. चालू वर्षात 5 अतिरिक्त तुकड्यांची निवड केली आहे. यातील 4 तुकड्यांचे प्रशिक्षण पार पडले असुन यात 46 शहरांमधील 106 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पाचवे सत्र 25 ऑगस्ट रोजी सुरू हेईल. या अभियानाच्या अंतर्गत 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 150 शहरांच्या 380 अग्निशमन कर्मचाऱ्यांना यशस्वीपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.









