दहावीत 98.94 टक्के, बारावीत 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ने (‘सीआयएससीई’) भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई-10वी) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र (आयएससी-12वी) 2023 चे निकाल रविवारी दुपारी 3 वाजता जाहीर केले. यंदा दहावीत 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलींचे प्रमाण 99.21 टक्के आणि मुलांचे प्रमाण 98.71 टक्के इतके आहे. तर बारावीत 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 98.01 टक्के मुली आणि 95.96 टक्के मुले यशस्वी झाली आहेत.
‘सीआयएससीई’-2023 च्या 10वी-12वी परीक्षेत सुमारे 2.5 लाख विद्यार्थी बसले होते. इयत्ता बारावीमध्ये 5 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला असून त्यापैकी 3 मुली आहेत. तर दहावीमध्ये 9 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्येही 3 मुलींचा समावेश आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही वर्गांचा निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच आपापल्या शाळांमध्येही निकालाची प्रत विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला निकालावर काही आक्षेप असल्यास किंवा गुणांवर समाधानी नसल्यास ते पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतात. उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी विद्यार्थ्यांना 21 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.









