वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीचा जेनिक सिनेर आणि अमेरिकेचा टेलर फ्रिज यांच्यात रविवारी पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इटलीच्या सिनेरने जॅक ड्रेपरचा 7-5, 7-6 (7-3), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात ड्रेपर परतीचे फटके मारताना तसेच स्वत:ची सर्व्हिस राखण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 23 वर्षीय सिनेरने ही लढत सरळ सेट्समध्ये जिंकून अंतिम फेरी गाठली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष विभागात अंतिम फेरी गाठणारा सिनेर हा पहिला इटालियन टेनिसपटू आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळविणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान असून अमेरिकेचा टेलर फ्रिज याची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार होत असल्याने हा अंतिम सामना चुरशीचा होईल अशी प्रतिक्रिया सिनेरने या सामन्यानंतर केली.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिजने आपल्याच देशाच्या फ्रान्सीस टिफोईवर 4-6, 7-5, 4-6, 6-4, 6-1 अशा पाच सेट्समधील लढतीत मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा टेलर फ्रिज हा अमेरिकेचा दुसरा टेनिसपटू आहे. हा उपांत्य फेरीचा सामना चांगलाच रंगला. टिफोईने पहिला सेट 6-4 असा जिंकून फ्रिजवर आघाडी मिळवली. पण त्यानंतर फ्रिजने दुसरा सेट 7-5 असा जिंकून बरोबरी साधली. टिफोईने तिसरा सेट 6-4 असा जिंकून पुन्हा फ्रिजवर बढत घेतली. त्यानंतर शेवटचे दोन सेट्स फ्रिजने आपल्या वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. टेलर फ्रिजला मिचेल रसेलचे मार्गदर्शन लाभत आहे.









