वृत्तसंस्था/सिनसिनॅटी
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा जेनिक सिनेर तसेच अमेरिकेचा टिफोई यांच्यात पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. सिनेरने उपांत्यफेरीत जर्मनीच्या व्हेरेव्हचा तर टिफोईने रुमानियाच्या रुनेचा पराभव केला.
उपांत्यफेरीच्या सामन्यात जेनिक सिनेरने व्हेरेव्हचा 7-6(9-7), 5-7, 7-6(7-4) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्यफेरीचा सामना तीन तास चालला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सेस टिफोईने होल्गेर रुनेचा 4-6, 6-1, 7-6(7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. टिफोईने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत आता पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. या पहिल्या 20 खेळाडूंमध्ये अमेरिकेच्या पाच टेनिसपटूंचा समावेश आहे.









