वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे झालेल्या सिनसिनॅटी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनेरने तसेच आर्यना साबालेंकाने अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीतील अजिंक्यपदे पटकाविली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सिनेर आणि साबालेंका यांनी अजिंक्यपद मिळविले आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जेनिक सिनेरने अमेरिकेच्या फ्रान्सीस टिफोईचा 7-6(7-4), 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडत अजिंक्यपद मिळविले. 2008 नंतर या स्पर्धेत जेतेपद मिळविणारा इटलीचा सिनेर हा सर्वात तरुण टेनिसपटू आहे. सिनेरने शुक्रवारी आपला 23 वा वाढदिवस साजरा केला होता. 2008 साली ब्रिटनच्या अॅन्डी मरेने ही स्पर्धा आपल्या वयाच्या 21 व्या वर्षी जिंकली होती. 2006 नंतर या स्पर्धेत एकाही अमेरिकन टेनिसपटूला विजेतेपद मिळविता आलेले नाही. 2006 साली अमेरिकेच्या अॅन्डी रॉडिकने या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात साबालेंकाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 6-3, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर साबालेंकाचे हे पहिले जेतेपद आहे. साबालेंकाने डब्ल्युटीए टूरवरील आतापर्यंत 15 स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेत साबालेंकाने यापूर्वी उपांत्यफेरी पार केली नव्हती. पण यावेळी तिने दर्जेदार खेळ करत जेतेपद हस्तगत केले. महिला टेनिसपटूंच्या ताज्या क्रमवारीत आता साबालेंका दुसऱ्या स्थानावर आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत साबालेंकाचे लक्ष जेतेपदावर राहिल.









