वृत्तसंस्था/ मियामी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनेरने स्पेनच्या टॉप सीडेड कार्लोस अलकॅरेझचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
इटलीच्या सिनेरचा हा अलकॅरेझवरील पहिला विजय आहे. सिनेरने उपांत्य सामन्यात अलकॅरेझचा 6-7 (4-7), 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. या लढतीत 21 वर्षीय सिनेरने शेवटच्या सेटमध्ये अंतिम 21 पैकी 19 गुण घेत अलकॅरेझचे आव्हान संपुष्टात आणले. हा सामना सुमारे 3 तास चालला होता. या लढतीत सिनेरने तसेच अलकॅरेझने रॅलीज त्याचप्रमाणे वेगवान सर्व्हिसवर अधिक भर दिला होता. एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेमध्ये सिनेरने दुसऱ्यांदा एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्या वर्षी मियामी स्पर्धेतच त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. आता इटलीचा सिनेर व रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









