दुबईत बसून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक : कोडगूमधील वृद्धाची सव्वादोन कोटींची फसवणूक
बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सावजाला ठकविणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या कारवाया वाढल्या आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यातही गेल्या सात महिन्यांत दहाहून अधिक प्रकार घडले आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू असतानाच सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य झाले आहे. कोडगू जिल्ह्यातील एका वृद्धाला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ठकविल्याच्या आरोपावरून दुबईमधील प्रमुख आरोपीसह पाच जणांच्या टोळीला सीआयडीने अटक केली आहे. या टोळीने कर्नाटकातील विविध जिल्ह्यात गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून आणखी अनेक गुन्हे उजेडात येणार आहेत.
कोडगू येथील वृद्धाची फसवणूक
कोडगू येथील एका 75 वर्षीय वृद्धाला 11 मे रोजी फोन करून तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये 200 ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ आहे. यासंबंधी सायबर क्राईम विभागाशी चर्चा करा, नाहीतर तुमच्या अडचणी वाढणार, असे सांगत व्हिडिओ कॉल केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या वेशातील एका गुन्हेगाराने वृद्धाला धमकावून मोठी रक्कम मागितली होती.
बेअब्रू होण्याच्या भीतीने 2.21 कोटी गुन्हेगारांच्या खात्यावर
बेअब्रू होण्याच्या भीतीने 75 वर्षीय वृद्धाने 18 व 19 मे रोजी दोन टप्प्यांत 2 कोटी 21 लाख 40 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या खात्यात जमा केले होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर सीआयडीने तपासाची सूत्रे हाती घेतली होती. तब्बल 26 बँक खात्यांमध्ये 2 कोटी 21 लाखांचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. कमिशन देण्याचे सांगून काही एनजीओंच्या नावे असलेली बँक खाती, एटीएम कार्ड या गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी वापरली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पाच जणांना अटक करून त्यांच्याजवळून 1 कोटी 70 लाख रुपये रोख रक्कम, 7,700 अमेरिकन डॉलर व सुमारे 20 लाख रुपये किमतीची बेन्झ कार जप्त केली आहे. प्रमुख आरोपी युसुफ सेठ हा कामानिमित्त बेंगळूरला आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये अड्डे
दुबईसह वेगवेगळ्या देशांमध्ये सायबर गुन्हेगारांनी अड्डे थाटले आहेत. भारतातील हजारो तरुण मोठ्या पगाराचे काम मिळविण्याच्या आमिषाने या गुन्हेगारांच्या तावडीत सापडले आहेत. नोकरी देण्याचे सांगून परदेशात सायबर गुन्हेगारांनी थाटलेल्या अड्ड्यावर या तरुणांचा वापर करून घेण्यात येत आहे. दुबईत बसून युसुफ सेठ हा डिजिटल अरेस्टचा धंदा चालवत होता.
सायबर गुन्हेगारांच्या टोळीत युसुफ प्रमुख
दुबईमध्ये वास्तव्यास असणारा युसुफ सेठ व बेंगळूर येथील महम्मद शाकीब, मोहम्मद अयान, एहसान अन्सारी व सोलोमन राज यांना अटक करण्यात आली आहे. युसुफ सेठ हा दुबईमध्ये राहतो. सोलोमननेही गेल्या काही वर्षांपासून दुबईत बस्तान बसवले होते. युसुफ हा सायबर गुन्हेगारांच्या टोळीत प्रमुख असल्याची माहिती मिळाली आहे.









