सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये प्रार्थनेवेळी रक्तपात ः मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
ओंदो / वृत्तसंस्था
नायजेरियातील ओंदो शहरातील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये सोमवारी गोळीबाराची घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. प्रार्थना सुरू असतानाच सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करत खळबळ उडवून दिली आहे.
काही सशस्त्र लोक चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी चर्चमध्ये स्फोटही केला. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 4ः30 वाजता) ही घटना घडली. हा हल्ला कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेच्या वेळी तेथे प्रार्थना सुरू होती. हल्लेखोरांनी प्रार्थना करणाऱया एका व्यक्तीचे अपहरण केल्याची माहिती लोकप्रतिनिधी अडेलेग्बे टिमिलीन यांनी दिली.
शहरात प्रथमच मोठी रक्तपाती घटना
हल्ल्यानंतरचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये चर्चमध्ये लोक रक्ताच्या थारोळय़ात पडलेले दिसत आहेत, तर आजूबाजूचे लोक आरडाओरडा करत आहेत. द्वेषाच्या विचारसरणीच्या लोकांनी असे घृणास्पद कृत्य करत निष्पापांचा जीव घेतला आहे. अशा द्वेषी लोकांसमोर देश कधीच झुकणार नाही आणि त्यांच्याकडून जिंकून दाखवेल, असे नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदु बुहारी म्हणाले. तर ओवोच्या इतिहासात यापूर्वी कधीही अशी घटना घडली नाही, असे आमदार ओलुवोळे यांनी नमूद केले.