राजस्थानात भाजपला मोठा फायदा शक्य : छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर : एबीपी-‘सी-व्होटर’चा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सी-व्होटर आणि एबीपी न्यूजने ओपिनियन पोल जाहीर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या राज्यांमध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरामचा समावेश आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. ओपिनियन पोलनुसार 119 जागा असलेल्या तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर यांना धक्का बसू शकतो. मिझोराममध्ये झोरमथांगाचा पक्ष जिंकू शकतो. पण काँग्रेसही मागे राहणार नाही. तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही चुरशीची स्पर्धा आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये पुढील महिन्यात वेगवेगळ्या तारखांना विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. तत्पूर्वी सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार सोमवारी मतदानपूर्व स्थितीचे अंदाज जाहीर करण्यात आले. ओपिनियन पोलमध्ये पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत जनतेला अनेक प्रश्न विचारण्यात आले असून त्यामध्ये त्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे. सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे मत सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सुमारे 90 हजार लोकांशी बोलणे झाले आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.
ओपिनियन पोलनुसार, मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड चुरसपूर्ण वातावरण राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभेच्या 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मध्य प्रदेशातील सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला निवडणुकीत फायदा मिळू शकतो. 230 जागांपैकी काँग्रेसला 113-125 जागा, भाजपला 104-116 जागा, बसपाला 0-2 जागा आणि इतरांना 0-3 जागा मिळू दर्शविण्यात आल्या आहेत.
राजस्थानमध्ये भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. राजस्थानमधील सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार 200 जागांपैकी भाजपच्या पारड्यात 127 ते 137 जागा मिळणार असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. निवडणुकीत काँग्रेसला 59-69 जागा मिळतील. तर इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मिझोराममधील 40 जागांपैकी सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) 13 ते 17 जागा मिळण्याची शक्मयता आहे. दुसरीकडे काँग्रेसला 10-14 जागा मिळण्याची शक्मयता आहे. राज्याच्या झोरम पीपल्स मूव्हमेंटला (झेडपीएम) 9-13 जागा मिळू शकतात. इतरांना 1-3 जागा मिळतील असा अंदाज आहे.
तेलंगणातील एकूण 119 जागांपैकी काँग्रेसला 48 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथे सत्ताधारी बीआरएसला 43 ते 55 जागा मिळतील असे सर्वेक्षणात दिसून येत आहे. तसेच भाजपला 5 ते 11 आणि इतर पक्षांनाही 5-11 जागांचे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील सर्वेक्षणानुसार एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक 45 ते 51 जागा मिळताना दिसत आहेत. येथे 39 ते 45 जागा मिळवत भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्मयता आहे. तर इतरांच्या पारड्यात 2 जागा दाखविण्यात आल्या आहेत.









