बिशप डॉ. डेरिक फर्नांडिस
बेळगाव : ख्रिसमस हा येशूख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक असून 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. येशूख्रिस्ताच्या जन्मामुळे सर्व मानवजातीला विश्वास आणि मोक्ष मिळाला. हा पवित्र सण धार्मिक सीमा ओलांडून जगभरातील लोकांमध्ये सद्भावना आणि ऐक्याला प्रेरणा देतो, असे बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे बिशप डॉ. डेरिक फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवार दि. 23 रोजी ख्रिसमसनिमित्त कॅम्प येथील बिशप हाऊसमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. फर्नांडिस पुढे म्हणाले, ख्रिसमस म्हणजे येशूंच्या जन्माचा ऐतिहासिक स्मरणोत्सव आहे.
हा ख्रिस्तांच्या खोल आध्यात्मिक चिंतनाचा आणि देवाच्या महान प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. जन्मकथा ही नम्रतेचे आठवण करून देणारी आहे. कारण देवाच्या पुत्राचा जन्म एका गोठ्यात झाला होता. ख्रिसमस ही एक अशी घटना आहे जी आपल्याला या वस्तुस्थितीची आठवण करून देते आणि या अंधारमय जगात जगण्याचा एक प्रकाशाचा सण म्हणजे ख्रिसमस. या काळात जगातील सर्व चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना, जन्मनाटके व प्रार्थना सेवा आयोजिल्या जातात. ठिकठिकाणी गायन आणि ख्रिसमसचे कार्यक्रम होणार आहेत. जयंती वर्ष 2025 चे उद्घाटन 29 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव येथील फातिमा कॅथेड्रल (मुख्य मंदिर) येथे होणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर, चंदगड, बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, बागलकोट भागातील लोक सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.









