चर्च तसेच घरांना विद्युत रोषणाई
प्रतिनिधी/ बेळगाव
ख्रिश्चन धर्मियांचा महत्त्वाचा सण असणारा नाताळ (ख्रिसमस) बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री उशिरापर्यंत नाताळाचा आनंद घेण्यासाठी कॅम्प परिसरात ख्रिश्चन धर्मियांची गर्दी होती. चर्च तसेच घरांना विद्युत रोषणाई करून देखावे करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्वांचे आकर्षण असलेले सांताक्लॉजदेखील जागोजागी दिसून आले.
बेळगावच्या फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये बुधवारी सकाळी ख्रिश्चन समुदायातर्फे सामुहिक प्रार्थना करण्यात आली. बिशप डॉ. डेरिक फर्नांडिस यांनी नाताळानिमित्त सर्वांना शांतीचा संदेश दिला. चर्च परिसरात प्रभू येशूच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. मेथॉडिस्ट चर्चबरोबरच सेंट अॅन्थनी चर्च, इम्यॅक्युलेट कन्स्पिशन चर्च, डिव्हाईन मर्सी चर्च, माऊंट कार्मेल चर्च, सेंट सेबेस्टियन चर्च, सेंट्रल मेथॉडिस्ट चर्च याठिकाणी प्रार्थनेसाठी गर्दी झाली होती. कॅरोल सिंगिंग हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
चर्चना करण्यात आलेली आकर्षक सजावट नेत्रदीपक ठरली. यामुळे कॅम्प परिसरात मोठी गर्दी दिसून आली. याचबरोबर संगोळ्ळी रायण्णा रस्त्यावरही चर्च परिसरात ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी झाली होती. सांताक्लॉजकडून भेटवस्तू घेण्यासाठी बालचमूंचा प्रयत्न सुरू होता. त्याचबरोबर खेळणी विक्रेतेही मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
आकर्षक फ्लेव्हर्स केकने वाढविली गोडी
ख्रिसमसनिमित्त ख्रिस्तीबांधव फ्लेव्हर्स केक तयार करीत असतात. काही जण घरीच केक तयार करतात. तर इतर बेकरीमधून केक मागवत असतात. यामुळे विविध फ्लेव्हरमधील केक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. एकूणच नाताळामुळे शहर तसेच उपनगरांमध्ये उत्साह दिसून आला.









