प्रतिनिधी/ बेळगाव
कोणताही उत्सव, सण हा आपल्याला आणि इतरांनाही आनंद देणारा हवा. भारतीय परंपरेमध्ये सर्व धर्म समभाव महत्त्वाचा मानला गेला आहे. वर्षभर आपल्याकडे वेगवेगळ्या सण आणि उत्सवांची मांदियाळीच असते. ख्रिसमस हासुद्धा असाच एक उत्सव किंवा सण.
ख्रिसमसच्या निमित्ताने सांताक्लॉज येऊन वेगवेगळ्या भेटवस्तू ठेवून बालचमूला आनंदित करतो, अशी एक कथा आहे. अर्थातच सांताक्लॉजच्या स्वरुपात पालकच मुलांच्या उशापाशी भेटवस्तू ठेवून त्यांना आनंद देतात. ‘तरुण भारत’ कार्यालयामध्येसुद्धा ख्रिसमस साजरा करण्यात आला.
‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर यांनी ख्रिसमसदिवशी अत्यंत अनपेक्षितपणे सांताक्लॉजसह कार्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वारापाशी उभारलेल्या आणि विविध वस्तूंनी सजविलेल्या ख्रिसमस ट्रीजवळ तरुण भारत परिवारातील सदस्य एकत्र आले. सर्वांनीच सांताच्या टोप्या घालून ख्रिसमसची गाणी म्हटली. त्यानंतर सांताक्लॉजने त्यांना चॉकलेट दिले. तसेच सर्व विभागांमध्ये जाऊन चॉकलेट्स वाटप केले. त्याचप्रमाणे हिंडलगा येथील कार्यालयामध्येसुद्धा सांताने सर्वांना चॉकलेट्सचे वाटप केले.
अत्यंत अनपेक्षितरीत्या आगमन झालेल्या सांताक्लॉजला पाहून सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का बसला. अनेकांनी त्याच्यासमवेत फोटो आणि सेल्फी काढून घेऊन ही आठवण कायमस्वरुपी आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त केली.









