जेसिंडा आर्डर्न देणार राजीनामा ः राजकीय संकटमोचक अशी ओळख
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडचे शिक्षणमंत्री ख्रिस हिपकिन्स हे देशाचे पुढील पंतप्रधान होणार आहेत. 44 वर्षीय हिपकिन्स हे वर्तमान पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांची जागा घेण्याच्या शर्यतीत सामील एकमेव उमेदवार आहेत. परंतु हिपकिन्स यांना पंतप्रधानपद मिळविण्यासाठी रविवारी संसदेत स्वतःच्या लेबर पार्टीच्या सहकाऱयांचे समर्थन प्राप्त करावे लागणार आहे, परंतु ही केवळ एक औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. सुमारे साडेपाच वर्षे पंतप्रधानपदी राहिलेल्या आर्डर्न यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा करत 50 लाख लोकसंख्या असलेल्या देशाला चकित केले होते.
केवळ एक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने आर्डर्न यांच्यानंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी दीर्घ प्रक्रिया टाळण्यासाठी हिपकिन्स यांना समर्थन दर्शविले आहे. हिपकिन्स हे किमान 8 महिन्यांपर्यंत पंतप्रधानपद सांभाळणार आहेत, त्यानंतर देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणूक पूर्व सर्वेक्षणांनुसार लेबर पार्टीची स्थिती मुख्य विरोधी पक्ष ‘नॅशनल पार्टी’च्या तुलनेत अधिक चांगली आहे.
आर्डर्न यांच्यावर होता राजकीय दबाव
कोरोना महामारीदरम्यान संकट व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावून हिपकिन्स हे लोकांच्या नजरेत आले होते, कोविड मिनिस्टर म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे जगभरातून कौतुक झाले होते. नेतृत्वाच्या स्वतःच्या नव्या शैलीमुळे आर्डर्न या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. वयाच्या केवळ 37 व्या वर्षी पंतप्रधान झालेल्या आर्डर्न यांची न्यूझीलंडमधील गोळीबाराची घटना तसेच महामारी हाताळण्यावरून जगभरात प्रशंसा झाली होती. परंतु देशात त्या मोठय़ा राजकीय दबावाला सामोऱया जात होत्या.
पाणावलेल्या डोळय़ांनी राजीनाम्याची घोषणा
आर्डर्न यांनी अशा काही आव्हानांना तोंड दिले आहे, ज्यांना न्यूझीलंडच्या नेत्यांनी कधीच अनुभवले नव्हते. महिला म्हणून आर्डर्न यांच्याविरोधात अनेक ऑनलाइन टिप्पणी करण्यात आल्या तसेच धमक्याही देण्यात आल्या होत्या. 7 फेब्रुवारी हा पंतप्रधान म्हणून माझा अखेरचा दिवस असेल. माझ्या कार्यकाळाचे सहावे वर्ष सुरू होणार आहे आणि मागील प्रत्येक वर्षात मी माझे सर्वोत्कृष्ट योगदान दिले असल्याचे पाणावलेल्या डोळय़ांसह आर्डर्न यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
हिपकिन्स यांचे राजकीय कौशल्य
न्यूझीलंडमध्ये आगामी निवडणूक 14 ऑक्टोबर रोजी होणार असून तोपर्यंत खासदार म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा आर्डर्न यांनी केली आहे. शिक्षण विभाग सांभाळण्यासह हिपकिन्स हे पोलीस तसेच सार्वजनिक सेवा मंत्री आणि सभागृहाचे नेते देखील आहेत. त्यांना राजकीय संकटमोचक म्हणून ओळखले जाते, अन्य खासदारांकडून निर्माण करण्यात आलेल्या समस्या दूर करण्यास त्यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नव्या पंतप्रधानांसमोरील आव्हाने न्यूझीलंड सध्या महागाई आणि सामाजिक असमानतेच्या समस्येला तोंड देत आहे. यामुळे तेथे लेबर पार्टीच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. तसेच लेबर पार्टी देशात 2017 पासून सत्तेवर असल्याने सत्ताविरोधी भावनाही अधिक आहे, अशा स्थितीत हिपकिन्स यांना या सर्व आव्हानांना पेलून ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.









