गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांनी दिली शपथ
@ वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी ख्रिस हिपकिन्स यांची वर्णी लागली आहे. राजधानी वेलिंग्टन येथे बुधवारी झालेल्या समारंभात गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांनी त्यांना शपथ दिली. पक्षाच्या बैठकीमध्ये ख्रिस हिपकिन्स यांच्या नियुक्तीला औपचारिकपणे मान्यता मिळाल्यानंतर ते पंतप्रधान होण्यासोबतच लेबर पार्टीचे नेतेही बनले आहेत. नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते एकमेव उमेदवार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
न्यूझीलंड सध्या महागाई आणि सामाजिक समानतेशी झुंजत आहे. त्यामुळे मजूर पक्षाच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट झाली आहे. न्यूझीलंडमध्ये 2017 पासून मजूर पक्ष सत्तेत असल्यामुळे अँटी-इन्कम्बन्सी (सत्ताविरोधी भावना) खूप जास्त आहे. देशातील अस्थिर वातावरणात ख्रिस हिपकिन्स यांच्याकडे नेतृत्त्व आले असून नजिकच्या काळात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंतप्रधानपद ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी असून मी पुढे येणारी आव्हाने आणि जबाबदाऱया स्वीकारण्यास तयार असल्याचे हिपकिन्स यांनी स्पष्ट केले आहे.
44 वषीय ख्रिस हिपकिन्स 2008 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. 2020 मध्ये जगभर कोरोना महामारीचा संसर्ग झाल्यानंतर आव्हानात्मक स्थितीत ख्रिस हिपकिन्स यांच्याकडे कोविड मंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांच्या कामाचे जगभरात कौतुक झाले होते. तसेच आता पंतप्रधान होण्यापूर्वी ते पोलीस, शिक्षण आणि लोकसेवा मंत्री होते. जेसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्यानंतर ख्रिस हिपकिन्स पंतप्रधान झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांपर्यंत हिपकिन्स यांना देशाची धुरा सांभाळावी लागणार आहे.
पंतप्रधानपद सोडताना जेसिंडा आर्डर्न भावुक
जेसिंडा आर्डर्न यांचा पंतप्रधान म्हणून बुधवारी अखेरचा दिवस होता. त्यांना या पदावरून निरोप देताना संसद भवनात आयोजित कार्यक्रमात सर्व प्रतिनिधींनी त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर गव्हर्नमेंट हाऊसमध्ये जात त्यांनी औपचारिकपणे राजा चार्ल्स यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. 19 जानेवारीला त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. आणखी चार वर्षे नेतृत्व करण्याची माझ्यात हिंमत नाही असे सांगत आता राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताना केले होते.









