वृत्तसंस्था/ डुसेलडार्फ, जर्मनी
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेतील सामन्यात चमकदार प्रदर्शन करीत स्पेनवर 2-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला.
अन्नू (21 वे मिनिट) व साक्षी राणा (47) यांनी भारताचे गोल नोंदवले. स्पेनचा एकमेव गोल लिमा तेरेसाने 23 व्या मिनिटाला नोंदवला. या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला भारताने अनेकदा आक्रमणे केली, पण स्पेनच्या बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. त्यामुळे या सत्रात गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात भारताने खेळाचा वेग वाढविला आणि त्यात त्यांना यशही मिळाले. 21 व्या मिनिटाला अन्नूने कोंडी फोडत शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले.
मात्र भारताची ही आघाडी फार वेळ टिकली नाही. दोनच मिनिटानंतर स्पेनने बरोबरी साधण्यात यश मिळविले. तेरेसाने मैदानी गोल करूनच सामना 1-1 वर आणला. मध्यंतरापर्यंत ही बरोबरी कायम राहिली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी उत्तम बचाव केल्याने एकही गोल होऊ शकला नाही. शेवटच्या सत्रात मात्र भारताने आणखी जोर वाढवला आणि त्याला यशही मिळाले. साक्षीने 47 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून भारताला 2-1 अशी मिळवून दिली. अखेरपर्यंत स्पेनने बरोबरीसाठी जोरदार प्रतिआक्रमण केले. पण भारताने त्याला रोखण्यात यश मिळविले आणि ही आघाडी कायम राखत विजय साकार केला.









