वृत्तसंस्था/ डुसेलडार्फ, जर्मनी
सुदीप चिरमाकोने दोन गोल नोंदवले असले तरी येथे सुरू असलेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेतील सामन्यात भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाला यजमान जर्मनीकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
चिरमाकोने 7 व 60 व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर मिचेल स्ट्रूथॉफ (41), बेन हसबॅक (53) व फ्लोरियन स्पर्लिंग (55) यांनी जर्मनीचे गोल नोंदवले. पहिल्या सामन्यात स्पेनवर 6-2 असा मोठा विजय मिळविला असल्याने भारत या सामन्यात आत्मविश्वासाने उतरले होते आणि सातव्याच मिनिटाला चिरमाकोने भारताला पहिले यश मिळवून दिले. जर्मनीने बरोबरीसाठी बरीच धडपड केली, पण भारताने पहिल्या सत्राअखेरपर्यंत ही आघाडी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात जर्मनी बरोबरीसाठी प्रयत्न करीत असताना भारतानेही आपली आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघांनी चांगला बचाव केल्याने मध्यंतरापर्यंत भारताची 1-0 आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात जर्मनीने आपले आक्रमण जास्त तेज केले. पण भारताने चांगला बचाव करीत त्यांचे प्रयतन फोल ठरविले. मात्र 41 व्या मिनिटाला मिचले स्ट्रथॉफने भारताचा बचाव भेदण्यात यश मिळवित गोल नोंदवून जर्मनीला बरोबरी साधून दिली. तिसरे सत्र संपेपर्यंत ही बरोबरी कायम राहिली.
शेवटच्या पंधरा मिनिटांत दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे करीत एकमेकांच्या क्षेत्रात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात बेन हसबॅकने 53 व्या मिनिटाला गोल नोंदवून जर्मनीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि दोनच मिनिटांनंतर फ्लोरियन स्पर्लिंगने त्यात आणखी एका गोलाची भर घालत 3-1 अशी आघाडी घेतली. िचरमाकोने अखेरच्या मिनिटाला वैयक्तिक व भारताचा दुसरा गोल केला. पण पराभव टाळण्यात यश आले नाही. सोमवारी भारताची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे.









