रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? तातडीने रस्ता करण्याबाबत पावले उचलण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व गोव्याचे संबंध रोजचे आहेत. गोव्यामधून मोठय़ा संख्येने नागरिक बेळगावला येत असतात तर बेळगावमधूनही गोव्याला जाणाऱयांची संख्याही अधिक आहे. भाजीपाला, दूध यासह इतर वस्तू मोठय़ा प्रमाणात गोव्यामध्ये पाठविल्या जातात. मात्र सध्या गोव्याला जाणारा जवळचा मार्ग असणाऱया चोर्ला मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणेच ठरु लागले आहे. यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव आणि गोवा जेमतेम 100 ते 150 कि. मी. चे अंतर आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱयांची संख्याही अधिक आहे. गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा आहे. रामनगरकडून जाणारा अनमोडचा रस्ताही अत्यंत खराब आहे. त्यामुळे चोर्ला मार्गावरूनच अधिक वाहने ये-जा करत आहेत. असे असताना या रस्त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे.
सध्या हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करण्याबाबत अनेकवेळा आश्वासने दिली गेली. मात्र अद्याप तरी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. यातच पाऊस पडल्यामुळे त्या खड्डय़ांमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे ठरू लागले आहे.
या रस्त्यावर अनेक पूल आहेत ते देखील अरुंद आहेत. तसेच धोकादायक झाले आहेत. कुसमळीजवळ असलेला पूल हे अरुंद असून ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेव्हा नव्याने पुलाची बांधणी करणेदेखील महत्त्वाची आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे एखादे अवजड वाहन आले तर दुसऱया वाहनाला वाटदेखील मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा गांभीर्याने दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
केवळ बैठका व आश्वासने
जिल्हाधिकारी कार्यालयात या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत अनेकवेळा बैठका झाल्या. नुकतीच पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेलाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. तातडीने या रस्त्याचे काम हाती घ्यावे आणि कायमस्वरुपी उत्तम दर्जाचा रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.









