खड्डय़ातून वाट काढताना वाहने बिघडण्याचे प्रकार गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
गोवा बेळगाव दरम्यान चोर्ला घाट परिसरातील कर्नाटक हद्दीमधील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडून अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे सदर रस्त्यावरून प्रवास करणाऱया वाहन चालकांना कसरत करावी करावी लागत आहे. खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.
या महामार्गाची दुरुस्ती त्वरित हाती न घेतल्यास येणाऱया आठ दिवसांत चार चाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. गोव्याहून बेळगावला जाण्यासाठी चोर्ला घाट रस्त्यामुळे अंतर खूपच कमी होते. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक याच रस्त्यावरून जात आहे. पावसाळय़ापूर्वी सदर रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. ते त्वरित बुजविणे गरजेचे होते. मात्र याकडे कर्नाटक शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता पावसाळय़ात सदर खड्डे रुंद झाले असून अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे उडते चालकांची धांदल
गोवा हद्दीपासून पिरनवाडीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून चार चाकी वाहने चालवताना चालकांचे नाकीनऊ येतात. सध्या पाऊसही जोरदार लागत आहे. पाणी भरल्यामुळे खड्डय़ांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन चालकांची धांदल उडताना दिसत आहे. अनेकवेळा चारचाकी वाहने खड्डय़ांमध्ये रुतून बसतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. प्रवासी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. तसेच वाहनांना धक्के बसून बिघाड होण्याचे प्रकारही घडत आहेत.
कर्नाटक सरकारने त्वरित खड्ड बुजवावे !
पावसाळय़ापूर्वी सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते. यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत राहणार, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र सध्या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यास पहिल्याच पावसात रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होऊ लागलेला आहे. गोव्यातून बेळगावकडे जाणाऱया वाहनांसाठी सदर रस्त्यातून वाट काढताता नेहमीच डोकेदुखी होत आहे. यासाठी कर्नाटक सरकारने याची विशेष दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ताबडतोब हाती घ्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
चोर्ला-जांबोटी रस्ता जास्त खड्डेमय
कर्नाटक हद्दीमधील चोर्ला ते जांबोटी दरम्यानचा रस्ता अधिक खराब झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सदर भाग हा पूर्णपणे जंगलातून जात आहे?. यामुळे सदर खड्डे चुकविण्यासाठी बाजूने रस्ता नाही. यामुळे नाईलाजाने खड्डय़ातून वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे दररोज कित्येक वाहनांमध्ये बिघाड होत आहे. यामुळे वाहन चालकांची मोठी पंचाईत होते. या भागात मोबाईलची रेंज येत नाही. यामुळे गैरसोय होते. मेकॅनिक किंवा अन्य कोणाशी संपर्क साधने अशक्य होते. अशावेळी दुसऱया वाहनातून जांबोटी किंवा गोवा हद्दीत येऊन मेकॅनिकची व्यवस्था करावी लागते, अशी माहिती अनेक प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
गणेश चतुर्थीच्या काळात कसरत करावी लागणार
दोन महिन्यांनी गणेश चतुर्थीचा सण येणार आहे. गोव्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बेळगावात जातात. सध्या चोर्ला घाटात कर्नाटक भागातील रस्त्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांना बेळगावला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहेत. यामुळे शक्मय तेवढय़ा लवकर या रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात यावी, अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांतून होत आहे.









