वृत्तसंस्था / ओस्ट्राव्हा (झेक प्रजासत्ताक)
येथे मंगळवारी होणाऱ्या गोल्डन स्पाईक ओस्ट्राव्हा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवित असून या स्पर्धेत त्याचे लक्ष सुवर्णपदकावर राहील.
गोल्डन स्पाईक अॅथलेटिक्स स्पर्धेत गेल्या दोनवेळेला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे नीरज चोप्रा सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याचे 2025 च्या स्पर्धेतील पदार्पणच आहे. नीरज चोप्राचे प्रशिक्षक झेन झिलेझेनी यांनी आपल्या अॅथलेटिक्स कारकिर्दीत ही स्पर्धा 9 वेळा जिंकली आहे.
27 वर्षीय नीरज चोप्राला 2025 च्या अॅथलेटिक्स हंगाम निश्चितच चांगला गेला आहे. त्याने अलिकडेच पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक मिळविले. तसेच त्याने गेल्या मे महिन्यात झालेल्या डोहा येथील डायमंड लीग अॅथलेटिक्स टप्प्यात 90 मी. ची मर्यादा पहिल्यांदाच ओलांडत दुसरे स्थान मिळविले होते. 2023 आणि 2024 साली झालेल्या गोल्डन स्पाईक अॅथलेटिक्स स्पर्धेत स्नायु दुखापतीमुळे चोप्रा सहभागी झाला नाही. नीरज चोप्राचा प्रशिक्षक झेकच्या झिलेझेनीने 1986 ते 2006 दरम्यान ही स्पर्धा 9 वेळा जिंकली. तसेच झिलेझेनीने 1961 साली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविताना 90 मी. चा टप्पा ओलांडला होता. चोप्राने यापूर्वी ओस्ट्राव्हा स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. पण गोल्डन स्पाईक स्पर्धेत तो यावेळी प्रथमच सहभागी होत आहे. बेंगळूरमध्य 5 जुलैमध्ये नीरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत नीरज चोप्रा, पीटर आणि रोलेर हे अव्वल भालाफेक धारक सहभागी होत आहेत. ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाईक स्पर्धेत भालाफेक प्रकारात एकूण 9 स्पर्धक सहभागी होणार आहेत.









