दक्षिण आफ्रिकी क्रिकेट संघ हा खरं तर गुणवत्तेची खाण…बंदी उठल्यानंतर प्रत्येक विश्वचषकाच्या वेळी त्यांचा समावेश किताबाच्या दावेदारांत झाला. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीनं घात केला अन् त्यामुळं पाठीवर बसला तो दबावाखाली हडबडणाऱ्या ‘चोकर्स’चा शिक्का…मात्र इतक्या वर्षांनंतर त्यांनी तो डाग पुसून काढलाय नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत. म्हणूनच हा विजय जास्त दखल घेण्याजोगा…
कायल व्हेरेननं मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विजयी धाव फटकावली आणि ‘त्या’ संघाला अक्षरश: वेड लागायचंच बाकी राहिलं…अपवाद फक्त कर्णधार तेम्बा बावुमाचा. त्याचा मात्र प्रयत्न चालला होता तो डोळ्यांत तरळणारे अश्रू लपविण्याचा…समालोचन करणाऱ्या ग्रॅमी स्मिथनं लगेच मैदानावर धाव घेतली, तर शॉन पॉलोक मात्र बॉक्समध्येच बसून राहिला. तिथं ए. बी. डीव्हिलियर्स, स्टेनसारख्या माजी दिग्गज खेळाडूंना देखील आसवं अनावर झाली होती…
कारण ‘चोकर्स’ म्हणून साऱ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं अखेर यश मिळविलंय ते तो डाग पुसण्यात…‘प्रोटियास’नी ‘आयसीसी’चं जागतिक कसोटी जेतेपद मिळविलंय ते पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा पाच गड्यांनी पराभव करून. त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागलीय ती तब्बल 27 वर्षं…1998 साली दक्षिण आफ्रिकेनं पहिलीवहिली ‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्याला जागतिक किताब म्हणता येणार नाही…ए. बी. डिव्हिलियर्स, ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस, अॅलन डोनाल्ड, गॅरी कर्स्टन, शॉन पॉलोक, लान्स क्लुसनर, हशिम आमला, हर्षल गिब्स, जॉन्टी ऱ्होड्स, हेन्सी क्रोनिए, मॅकमिलनसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलं, परंतु शेवटपर्यंत त्यांना एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करणं जमलं नाही…
जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय बंदीला तोंड द्यावं लागलं तेव्हा माईक प्रॉक्टर, बॅरी रिचर्ड्स, पीटर पॉलोकसारखे अतिशय महान खेळाडू त्यांचं प्रतिनिधीत्व करत होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 4-0 असा धुव्वा उडविला होता…त्यांना पुन्हा खेळण्याची परवानगी मिळाली तेव्हा 10 नोव्हेंबर, 1991 रोजी पहिला एकदिवसीय सामना रंगला तो भारताविरुद्ध इडन गार्डन्सवर. त्यावेळी अॅलन डोनाल्डच्या कामगिरीनं सारं जग थक्क झालं होतं. कारण असा अव्वल दर्जाचा गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या तंबूत लपलाय याची त्यांना कल्पनाच नव्हती…त्यानंतर प्रत्येक विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला संभाव्य विजेत्यांच्या यादीत स्थान मिळायचं, परंतु जिंकणं मात्र शक्य होत नव्हतं…
दक्षिण आफ्रिकेला या वाटचालीदरम्यान अनेक धक्क्यांना तोंड द्यावं लागलंय. त्यात समावेश 1992 सालच्या विश्वचषकातील ‘डकवर्थ लुईस नियमा’चा, 1999 मधील एडबॅस्टनवरील घसरगुंडीचा, 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद होण्याची पाळी येण्याचा, 2015 मध्ये ऑकलंड इथं झालेल्या अपेक्षाभंगाचा अन् 29 जून, 2024 या दिवशी ‘टी-20’ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा…परंतु आता या साऱ्या दुर्दैवी क्षणांना तो संघ ‘गूडबाय’ म्हणू शकेल. कारण खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उगवला तो 14 जून, 2025 हा दिवस…
सर्वांत जास्त कौतुक करावं लागेल ते विजेत्या संघाचं कर्णधार तेम्बा बावुमाचं. तो खेळला त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा डाव. विशेष म्हणजे धोंडशिरेच्या दुखापतीनं त्रस्त असलेल्या बावुमाला मैदान सोडणं सहज शक्य होतं. परंतु त्यानं शक्य असेल तितका किल्ला लढविला…जोश हेझलवूड, पॅट कमिन्स नि स्टार्क यांची ताकद माहीत असल्यानं अर्धशतक झळकविणाऱ्या टेम्बानं दुखापतीची पर्वा न करता चौथ्या यष्टीसाठी 147 धावांची भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. त्याला शेवटपर्यंत टिकणं जमलेलं नसलं, तरी त्यानं आपल्यावरील जबाबदारी अतिशय चोखरीत्या पार पाडली. त्यानं 134 चेंडूंना जिद्दीनं तोंड दिलं ते चक्क एका पायाच्या साहाय्यानं असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये…
दक्षिण आफ्रिकेतील कित्येक टीकाकारांना तेम्बा बावुमा कर्णधार म्हणून अजिबात पसंत नव्हता…असंच घडलं होतं ते 2019 साली दक्षिण आफ्रिकेला जागतिक रग्बी स्पर्धेचं जेतेपद जिंकून देणाऱ्या सिया कोलिसीच्या बाबतीत. विशेष म्हणजे कोलिसीनं 2023 मध्ये सतत दुसऱ्यांदा किताब खेचून आणला आणि असा पराक्रम करणाऱ्या जगातील मोजक्याच कर्णधारांमध्ये स्थान मिळविलं…
2024 सालचा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आठवतोय ?…भारतानं यजमान संघावर सात गड्यांनी मात केली आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत संपविली. ही कसोटी चालली ती केवळ 107 षटकं नि संपुष्टात आली दोन दिवसांपेक्षाही कमी अवधीत. तिनं मान मिळविला तो इतिहासातील सर्वांत कमी दिवस चाललेल्या कसोटीचा…गोलंदाजांनी 33 फलंदाजांचा पाच सत्रांमध्ये अक्षरश: खात्मा केला. हे उदाहरणच खेळपट्टीचं भयानक स्वरुप स्पष्ट करण्यास पुरेसं. परंतु त्यावर देखील एक दर्जेदार खेळाडू चमकला होता आणि त्याचं नाव मार्करम. त्यानं 103 चेंडूंत 106 धावांचा रतीब ओतला…यावेळी देखील 207 चेंडूंत 136 धावा काढून ऑस्ट्रेलियाच्या योजनांत आडवा आला तो मार्करमच. तो हा डाव आयुष्यभर विसरणं अशक्य…
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा हा माजी कर्णधार पहिल्या डावात पॅव्हेलियनमध्ये परतला होता तो खातंही न उघडता. विराट कोहलीनं एकदा म्हटलं होतं की, मार्करम हा दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा खेळाडू…तेम्बा बावुमा व मार्करम यांचा विचार करताना रबाडाला विसरणं कसं शक्य होईल. जेव्हा विश्वातील दर्जेदार वेगवान गोलंदाजांविषयी चर्चा चालते तेव्हा सर्वांच्या तोंडी नावं असतात बुमराह, मिचेल स्टार्क वगैरे खेळाडूंची. तिथं रबाडाचा उल्लेख सहसा करण्यात येत नाही…विश्लेषकांच्या मते, किमान भविष्यात तरी त्याला मानाचं स्थान मिळायला हवं. बावुमानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि रबाडानं कांगारुंच्या उस्मान ख्वाजा व लाबुशेन या सलामीच्या जोडीला अक्षरश: नाचविलं. त्यांना काय करावं तेच कळेनासं झालं…
ऑस्ट्रेलियाला रबाडाच्या गोलंदाजीवर पहिली धाव नोंदविण्याची संधी मिळाली ती 20 व्या चेंडूवर. यावरून मारा किती धारदार होता ते लक्षात येतं. पहिल्या डावात 5 फलंदाजांना गुंडाळणाऱ्या आणि दुसऱ्या डावात 4 खेळाडूंना परतीची वाट दाखविणाऱ्या या गोलंदाजानं सामन्यात 110 धावा देऊन 9 बळी खात्यात जमा केले आणि त्याचं कसब दाखवित संघाच्या स्वप्नपूर्तीत मोलाचा वाटा उचलला !
ऐतिहासिक विजयातील पराक्रम…
- मार्करम हा चौथ्या डावात विजयाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतर्फे शतक फटकावणारा पाचवा फलंदाज…यापूर्वी असा पराक्रम केलाय ग्रॅमी स्मिथ, हर्षल गिब्स, ए. बी. डीव्हियर्स, हशिम आमला यांनी…
- मार्करमनं केलेली 136 धावांची सामना जिंकून देणारी खेळी म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं लक्ष्याचा पाठलाग करताना नोंदविली गेलेली दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या…
- यापूर्वी जागतिक कसोटी स्पर्धा न्यूझीलंड (2021) व ऑस्ट्रेलिया (2023) यांनी जिंकलीय ती भारताचा पराभव करून…
- ऑगस्ट, 2024 ते जून, 2025 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं सलग आठ कसोटी सामने खिशात घातले…यापूर्वी 2002 ते 2003 यादरम्यान त्यांनी सलग नऊ कसोटी लढती जिंकल्या होत्या…
- दहा कसोटी सामन्यांत बावुमाच्या यशाची टक्केवारी 90 टक्के. त्यानं 9 जिंकल्याहेत, तर एक अनिर्णीत राहिली…पहिल्या 10 कसोटी लढतींत एकही पराभव न स्वीकारता 9 विजय मिळविणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार…यापूर्वी इंग्लंडच्या पर्सी चॅपमननं पहिल्या 9 कसोटी सामन्यांत विजय मिळविल्यानंतर 10 व्या कसोटीत पराभव पत्करला होता…
असा पडला ‘चोकर्स’चा शिक्का…
- 1992 – विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविऊद्धचा उपांत्य सामना : महत्त्वाच्या क्षणी निराशा वाट्याला येण्याची दक्षिण आफ्रिकेची प्रथा ही या सिडनी येथील लढतीतून सुरू झाली. त्यांना 7 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती. त्याच वेळी पाऊस सुरू झाला आणि ‘डकवर्थ लुईस’ नियमामुळं एका चेंडूत 22 धावांची गरज असं समीकरण तयार झालं…
- 1999 – विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविऊद्धचा उपांत्य सामना : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंगने टाकलेल्या शेवटच्या षटकात त्यांना चार चेंडूंत त्यांना फक्त एका धावेची गरज होती. परंतु काही चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक धाव काढण्याच्या गडबडीत शेवटचा फलंदाज अॅलन डोनाल्ड धावबाद होऊन सामना ‘टाय’ झाला…
- 2003 – विश्वचषक : सुपर सिक्सच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी सहयजमान दक्षिण आफ्रिकेला दर्बानमध्ये श्रीलंकेवर विजय आवश्यक होता. 50 षटकांत 269 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची स्थिती 45 षटकांत 6 बाद 229 अशी असताना पावसानं खेळ थांबवला. ‘डीएलएस’च्या अंतर्गत सुधारित लक्ष्य 45 षटकांत 230 असं करण्यात आलं. मुथय्या मुरलीधरननं टाकलेल्या 45 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्क बाउचरनं षटकार खेचला आणि नंतर शेवटचा चेंडू खेळून काढला. कारण आपण आधीच जिंकलो आहोत असा गैरसमज त्यांनी करून घेतला. प्रत्यक्षात सामना ‘टाय’ झाला…
- 2015 – विश्वचषकातील न्यूझीलंडविऊद्धचा उपांत्य सामना : पावसामुळं 43 षटकांवर आणलेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 281 धावा केल्या होता. त्याचा पाठलाग करताना किवीज संघाला शेवटच्या तीन षटकांत 29 धावांची गरज होती. पण ग्रँट इलियटनं शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज डेल स्टेनला चौकार आणि एक षटकार ठोकल्यानं दक्षिण आफ्रिकेला आणखी एका उपांत्य सामन्यात निराश व्हावं लागलं…
- 2022 – टी20 विश्वषकातील नेदरलँड्सविरुद्धची ‘सुपर 12’ लढत : उपांत्य फेरीत प्रवेशासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अॅडलेड येथे अननुभवी नेदरलँड्सच्या 159 धावांचा पाठलाग करताना जोरदार धक्का बसला. नेदरलँड्सच्या जोशपूर्ण गोलंदाजीने त्यांना 145 धावांत गुंडाळले…
- 2024 – टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धचा अंतिम सामना : ब्रिजटाऊन येथे भारताविऊद्ध 177 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला एक वेळ 29 चेंडूत 26 धावांची आवश्यकता होती आणि हातात सहा गडी होते. पण हार्दिक पंड्यानं क्लासेनला बाद करून ब्रेक लावला आणि शेवटी त्यांना 8 बाद 169 पर्यंतच मजल मारता आली…
– राजू प्रभू









